राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या दृष्टीने कालचा दिवस खरंतर निर्णायक ठरला असं म्हणावं लागेल. कारण, मागील काही दिवसांपासून जोरदार राजकीय घडामोडी घडत असताना रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या विधानानंतर भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु झाल्या आणि अखेर भाजपा आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून मागे घेतला. भाजपाच्या या निर्णयानंतर स्वाभाविकपणे राजकीय वर्तुळातून तसेच सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटल्या. यात प्रामख्याने राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या पत्रावर जास्त प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर राज ठाकरेंनी भाजपाला पाठवलेलं पत्र हा एक स्क्रिप्टचा भाग होता असंही म्हटलं. संजय राऊतांच्या या टीकेला भाजपाकडून तर उत्तर देण्यात आलं. मात्र महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणतात, “राऊतजी आपणांस सगळेच जण ओळखून आहेत, आपली तीच ओळख चांगली आहे. आजपर्यंत मी तुमच्या कोणत्याच टीकेला उत्तर दिले नाही, पण आजही तुम्ही राज साहेबांबद्दल गरळ ओकली. तुमच्या जडणघडणीत राज साहेबांची तुम्हाला खुप मोठी मदत झालेली आहे हे तुम्ही विसरले आहात.”
एवढच नाहीतर “तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे व “एहसान फरामोश” म्हणून तुमची ओळख होऊ नये हीच सदिच्छा. म्हणून इथून पुढे तरी टिका करताना भान ठेवा.” असंही बाळा नांदगावकर यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत? –
मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊतांना काल हजर करण्यात आले होते. तेव्हा, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत यांनी, “भाजपाला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता. शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होती. भाजपाने या मतदारसंघात सर्वे केला होता. पराभवाची चाहूल लागल्यामुळेच भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला,” असं म्हटलं होतं. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
भाजपाकडून काय प्रत्युत्तर देण्यात आलं? –
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी “राज ठाकरे बोलले ते स्क्रिप्ट जर असेल तर मग शरद पवार जे बोलेले तीही स्क्रिप्ट आहे का? आम्ही शरद पवारांना सांगायला गेलो का स्क्रीप्ट करा म्हणून. राज ठाकरे हे सन्मानाने बोलले, राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली. राज ठाकरे नेहमीच आपली भूमिका मांडत असतात.” असं बोलून दाखवलं.