राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शाब्दिक वाद निर्माण झालाय. अमोट मिटकरी यांनी एक सभेमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केल्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. सभेमध्ये एका दमात हनुमान चालीसा म्हणणाऱ्या मिटकरी यांच्यावर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी निशाणा साधलाय.

“महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एका बाजारु विचारवंताचा उदय झालाय. हॉटेलमधला वेटर माहितीय ना, तो हॉटेलमध्ये गेल्यावर मेन्यूकार्ड पाठ असल्यासरखं बोलतो तशी याने सुरुवात केलीय. कोणीही याच्या नेत्याच्याविरोधात बोललं की हे पाठ आहे का ते पाठ आहे का… अरे काय आहे?,” असं म्हणत काळे यांनी मिटकरींवर निशाणा साधलाय.

“संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. तसं काल हा कोणत्यातरी सभेत राज ठाकरे बोलल्यानंतर हनुमान चालीसाचं पठण करत होता. माफ करा मी रेडा आणि या बाजारु विचारवंताची तुलना करु इच्छित नाही,” असंही काळे यांनी टीका करताना म्हटलंय. पुढे बोलताना काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. ‘दादा’, ‘साहेब’ आणि ‘ताई’ असा उल्लेख करत काळे यांनी मिटकरींनी त्यांच्या नेत्यांनाही हनुमान चालीसा पठणासंदर्भात प्रश्न विचारावा असं काळे म्हणालेत.

“जे प्रश्न तुम्ही आमच्या नेत्याला विचारताय ना. हनुमान चालीसा पाठ आहे का, याचं पठण, भगवत गीता पाठ आहे का? तुमचे दादा, साहेब आणि ताई यांनासुद्धा कधीतरी विचारा. त्यांनी स्टेजवर हे बोलून दाखवावं. आम्हीही बोलून दाखवतो,” असं थेट आव्हान काळेंनी मिटकरींना दिलंय.

पुढे बोलताना मिटकरींच्या राजकीय प्रवासावरुन काळेंनी निशाणा साधलाय. “स्वत:चा पक्ष ठाण्यामध्ये निर्माण केला तो विलीन केला राष्ट्रवादीत. आज राष्ट्रवादीत जाऊन आपण आमदार झालात विधान परिषदेचे. स्वत:च्या गावात बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून पराभव स्वीकारला. अहो तिथे तुम्हाला तुमचा पक्ष वाढवता येत नाही आणि तुम्ही राज ठाकरेंना शिकवायला लागलात,” असा टोला काळेंनी लगवालाय.

व्हिडीओच्या शेवटी काळे यांनी, “जेवढी आपली लायकी आणि औकात आहे तेवढचं बोलावं. नाहीतर या बाजारु विचारवंताचा बाजार उठवायला महाराष्ट्र सैनिक कमी करणार नाही,” असा इशाराह मिटकरींना दिलाय.

Story img Loader