२०१९ साली राज्यात सत्तांतर झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. पण, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरून अनेकदा टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश महाजन यांनी सांगितलं की, “बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांशी मैत्री जपली. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मातोश्रीवर नेऊन मासे खाऊ घालायचे. पण, शिवसेना भवनात कधी चहा पाजला नाही. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लालसेत आले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी खोट्या शपथा घेतल्या, की मला अमित शाहांनी वचन दिलं होतं.”
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये! अजित पवार संतापले; म्हणाले “चहात काय…”
“परंतु, एका मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही एवढं खाली पडू शकता. मुख्यमंत्रीपदावर असतानाही फार मोठं दिवे लावले. हे मुख्यमंत्री असताना पालघरला साधूंना ठेचून मारलं. केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. केजरीवालांना खोकला, उद्धव ठाकरेंना मनक्याचा आजार आणि दोघांचा डॉक्टर एकच, नरेंद्र मोदी,” अशी टोलेबाजी प्रकाश महाजन यांनी केली आहे.
हेही वाचा : मनसेला धक्का! राज ठाकरेंना पत्र लिहित मनसेच्या बड्या नेत्याचा राजीनामा
“मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी सोयरिक केली. लोकं मातोश्रीवर पाठिंबा मागण्यासाठी यायचे, हे मातोश्रीच्या बाहेर गेले. शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणाचे बिनचिपळीचे नारद आहेत. ही पदवी केशवराव धोंडगे यांनी शरद पवारांना दिली. शिवसेना संपण्याचा चंगच यांनी बांधला,” असेही प्रकाश महाजन यांनी म्हटलं.