मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर हर महादेव या चित्रपटाला आपला आवाज दिला आहे. राज ठाकरे यांनी चित्रपट निर्मितीत दिलेल्या या योगदानामुळे सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तीन भागाच्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचेही जाहीर केले. या चित्रपट निर्मितीचे काम कोणाकडे आहे? हे काम कुठपर्यंत आले आहे, हे सांगणे मात्र राज ठाकरे यांनी टाळले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला की यावर सविस्तर बोलुयात असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा>> “…तर मी तिरळाच झालो असतो” राज ठाकरेंनी सांगितला चित्रपटाला ‘व्हाईस ओव्हर’ देतानाचा ‘किस्सा’

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपटच होऊ शकत नाही. अफजलखान, शायिस्तेखान, पन्हाळगडावरून निघून विशाळगडावर जाणे, पावनखिंडीत सापडणे, आग्र्याहून सुटका या चार-पाच विषयांपलीकडेही शिवाजी महाराज आहेत. याच चार-पाच प्रसंगात अडकलो तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आपण अन्याय करत आहोत, असे मला वाटते. याच कारणामुळे आपण टीव्ही सिरियल करायला हवी, असे मला वाटले होते,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> तुमचं खरं नाव स्वरराज, मग आता केवळ राज नाव का? सुबोध भावेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले…

“पुढे याच विषयाला घेऊन मी आशुतोष गोवारीकर यांच्याशी बोललो. आशुतोष गोवारीकर यांच्याशी दोन-चार वेळा बोलणे झाले. एके दिवशी नितीन चंद्रकांत देसाई आमच्यासोबत होते. त्यांनी ही टीव्ही सिरीयल करण्याची तयारी दाखवली. मी त्यांना होकार दिला. पुढे नितीन देसाई यांनी सिरीजची निर्मिती केली. ही सिरीज खूप वर्षांपूर्वी येऊनही गेली,” अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा >>> आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या रमेश केरेंचे शरद पवारांना मेसेज, खुद्द पवारांनीच सांगितलं; म्हणाले…

“मात्र आता सगळेच मंच बदलले आहेत. चित्रपट निर्मितीचे सूत्र बदलले आहे. सर्व तंत्र बदलले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर दोन ते तीन भागात चित्रपट निर्मिती करण्याचा विचार सुरू आहे. मी हे काम कोणाकडे दिले आहे, याबाबतची अधिक माहिती आताच देणार नाही. हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा या विषयावर सविस्तर बोलू,” असे राज ठाकरे म्हणाले.

Story img Loader