अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. यानंतर देशभरात उत्सहाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी प्रभू श्री रामाच्या मनमोहक मूर्तीचा व्हिडीओ ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट केला आहे. त्यावर लिहिलं, “आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम!.”
हेही वाचा : अयोध्येतील राम मंदिराची नागर शैली नेमकी आहे तरी काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिरात आगमन झाल्यानंतर शंखनाद करण्यात आला. सनई चौघडे वाजवण्यात आले. यानंतर सभामंडपातून पंतप्रधान मोदी मंदिराच्या गाभाऱ्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी रामलल्लांची विधीवत पूजा केली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात रामल्लांची मूर्ती विराजमान झाली.
रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधानांच्या हस्ते श्री रामाची विधीवत पूजा झाल्यानंतर आरती करण्यात आली.
अयोध्येत भक्तांचा महासागर उसळला आहे. अयोध्येत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. त्यात उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ यांची उपस्थिती होती.