क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विनंती केली आहे. सावित्रीबाई फुले यांचं पुण्यातील भिडे वाडा येथील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या स्मारकासाठी विनंती करताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात आज एक्सवर पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात ज्यांनी मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. स्त्री स्वातंत्र्य औषधाला देखील सापडणार नाही अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. तो काळ असा होता की स्त्री शिकली तर तिच्या सात पिढ्या नरकात जातील असं मानण्याचा काळ. पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघेही ज्ञानासाठी आसुसलेले होते, आणि त्यामुळेच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि इतकंच नाही तर मुलींसाठी शाळा सुरु केली. त्यावेळच्या अखंड हिंदुस्थानातील, स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा. पण सावित्रीबाईंना प्रचंड अवहेलना, आणि उपहास सहन करावा लागला. आज थेट अंतराळात झेप घेणारी स्त्री असो की एखाद्या उद्योगसमूहाची प्रमुखपदी बसलेली स्त्री असो, तिचा हा प्रवास सावित्रीबाईंमुळेच शक्य झाला हे नक्की”, असं म्हणत राज ठाकरेंनी सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस अभिवादन केले.

हेही वाचा >> Savitribai Phule Jayanti : सावित्रीमाई तू होतीस म्हणून…, समाजाचं दडपण झुगारणाऱ्या क्रांतिज्योतीसाठी खास पत्र

“२ वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने पुण्यात ज्या भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या वाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचं तेव्हा आम्ही स्वागत केलं होतं आणि हे स्मारक लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मध्यंतरी या स्मारकाचं कामकाज कुठवर आलं आहे हे जाणून घेतलं, तेव्हा कळलं की मध्यंतरी हे काम अनेक कायदेशीर गुंतागुंतीत अडकलं होतं, त्यातले काही विषय न्यायप्रविष्ट होते, जे आता सुटलेत. मुळात इतक्या मोठ्या महापुरुषांच्या स्मारकांसाठी देखील आपल्याला कायदेशीर लढाया लढाव्या लागतात हेच दुर्दैव”, असं राज ठाकरे म्हणाले.

“पण आता हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच अपेक्षा. आणि स्मारक म्हणजे एखादा पुतळा किंवा एखादं संग्रहालय इतकं मर्यादित न ठेवता, त्याला आधुनिकतेची जोड द्यावी. यासाठी सरकारी साचा सोडला पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आढावा घेणारा एखादा बहुभाषिक साउंड आणि लाईट शो, एखादी डिजिटल लायब्ररी असं काहीतरी असावं. आणि हे सगळं एका कालमर्यादेत पूर्ण करावं. अन्यथा इतर अनेक स्मारकं जशी लालफितीत अडकतात तसं हे स्मारक अडकू नये इतकीच इच्छा”, असं राज ठाकरे म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवर टोला

ते पुढे म्हणाले, “सरकारने कालच लाडक्या बहीण नक्की कोणाला म्हणावं याचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केला आहे, थोडक्यात निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असं दिसतंय. असो, असं धरसोडपण स्मारकाच्या बाबतीत दिसू नये”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader raj thackeray social media post for savitribai phule memorial sgk