“आमच्याकडे बैठका आताही होत असतात. मी जर बाहेर गेलो तर माझ्या जवळ कार्यकर्त्यांनी गर्दी होत राहणार. माझ्यासोबत पक्षाची लोकं असणार. म्हणून मी काळजीपोटी बाहेर पडलो नाही. पण ते शासकीय पदावर आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बाहेर जायला हवं. त्यांना अधिकाऱ्यांशी संवाद साधायचा आहे,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत यावरून त्यांच्यावर टीका करण्यात येते. परंतु तुम्ही का बाहेर पडत नाही, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
“मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केलंच पाहिजे. मला गेले काही महिने मुख्यमंत्री केवळ टिव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरूवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावंस वाटत नाही,” असं राज ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा- उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे
यापूर्वीही अनेक साथी
यापूर्वी आपल्याकडे अनेक साथी आल्या. त्यात किती लोकांना बाधा झाली किती लोकांचा मृत्यू झाला याचे आकडे पाहिले नाही. सरकारनं यावेळी बाऊ केला. ज्यांची घरं मोठी आहेत त्यांचं ठीक आहे. ते घरात स्वत:ला क्वारंटाइन करून घेऊ शकतात. पण झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांनी काय करावं. जर करोना वाढायचा असता तर झोपडपट्ट्यांची संख्या पाहता किती मोठ्या प्रमाणात तो वाढायला हवा होता. या सर्व गोष्टी पाहता याचा आकडा एवढाच कसा. हे काही चुकतंय. याचा ताळमेळ बसत नाही असं वाटत असल्याचं ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा- आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे
मास्कची गरज वाटत नाही
“देशात सर्वत्र मास्क अनिवार्य केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं मास्क परिधान करण्यास सांगितलं असलं तरी करोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. आमच्या जवळच्या लोकांनाही मास्क परिधान करून करोनाची बाधा झालीच. आत घाबरून घरात बसून चालणार नाही. उद्योगधंदे बंद आहेत अनेकांना लोकांना कामावरून काढून टाकलं आहे. आता सर्वकाही सुरू करण्याची वेळ आली आहे,” असं ते यावेळी म्हणाले.