शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये ठाकरे गटाचा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली होती. आता यावरूनच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला. ‘लोकसभा निवडणुकीत काहींनी मोदींना बिनशर्ट पाठिंबा दिला’, असी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टिकेवर प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

“हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत. पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांचे कपडे शाबूत ठेवणार नाही”, अशा खोचक शब्दांत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : “काँग्रेस लोकसभेला काठावरही पास नाही”, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल; म्हणाले, “ठाकरे गटाचं नाव आता उठा बसा संघटना”

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला, तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. मात्र, आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही”, अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केली होती.

पुढे बोलताना त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, “पक्ष फोडायचे, सरकार पाडायचं, फोडलेल्या लोकांना मंत्रिपदं द्यायची हा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे. आज मी मिंधे आणि भाजपाला आव्हान देतोय जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं चिन्ह न चोरता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून फिरा, विजेते म्हणून फिरु नका. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो वापरला दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader sandeep deshpande criticizes to uddhav thackeray shiv sena thackeray group foundation day gkt