MNS Party Internal Changes for BMC Elections: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यपद्धती व पुढील वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. तसेच, मनसे-ठाकर गट एकत्र येण्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर मनसेबाबत मोठी अपडेट समोर आली असून पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भातली माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मागच्या निवडणुकांमध्ये जे झालं ते विसरून पुढे वाटचाल करण्यासंदर्भात आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंनी मनसेच्या सर्व विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरेंनी विभाग अध्यक्षांना पालिका निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे.
बैठकीबाबत काय म्हणाले संदीप देशपांडे?
दरम्यान, या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीत आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात व्यापक चर्चा झाल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. “आता विधानसभा निवडणुका झाल्या. पण येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरं जायचंय यासाठी आज मुंबईच्या सर्व विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती. त्यात सर्व नेतेही उपस्थित होते. लवकरच येत्या काही दिवसांत पक्षात पूर्ण रिफॉर्म करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. तो बदल कसा असेल, हे येत्या काही दिवसांत दिसेल. बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत हे बदल झालेले पाहायला मिळतील”, असं सूचक विधान संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
विधानसभा निवडणुकीतील मनसेची कामगिरी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं १२८ उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांची एकही जागा निवडून आली नाही. कल्याणमधील मनसेचे आमदार राजू पाटील यांनाही पराभव पत्करावा लागला. खुद्द राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यांना पाठिंबा देण्यावरून झालेल्या वादामुळे सदा सरवणकर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांना पाठिंबा देण्यावरून भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यांच्यातही मतभेद निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं.
दरम्यान, राज ठाकरेंनी त्यांच्या नववर्षानिमित्त केलेल्या सोशल पोस्टमध्ये लवकरच पक्षातील नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर आता संदीप देशपांडेंनी पक्षात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे सूतोवाच केल्यामुळे मनसेची आगामी पालिका निवडणुकांसाठी काय रणनीती असेल? यासंदर्भातली उत्सुकता ताणली गेली आहे.