माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. २६ जुलै रोजी पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर आज २७ जुलै रोजी मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई, आमदार फुटी, आगामी विधानसभा निवडणूक तसेच अन्य विषयांवर आपली भूमिका मांडली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

संबंधित मुलाखतीच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, “कालच्या भागासारखाच हा भाग होता. त्यात वेगळं काही वाटलं नाही. टीव्हीवरील WWF ची मॅच असते ना, ज्यामध्ये द ग्रेट खली, जॉन सेना वगैरे असतात, त्याप्रकारची ही मुलाखत होती. ठीक आहे, लहान मुलांना अशी मॅच छान वाटते. कारण त्यात मारामारी पण होते आणि कुणाला लागतही नाही” असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली, पण हेच…” संजय राऊतांचे विधान

“केंद्र सरकारने निरोगी राजकारण करावं” या उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता, देशपांडे म्हणाले, “निरोगी राजकारण म्हणजे नेमकं काय? ते मला कळलं नाही. पण दुसऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, दुसऱ्यांच्या मागे क्राइम ब्रँच लावायची, याला ते निरोगी राजकारण म्हणतात का? कारण आपण कुठल्या पद्धतीचं राजकारण केलं? आपण लोकांचे नगरसेवक फोडले, त्यांना पैसे देऊन, फूस लावून फोडलं. अशाप्रकारचं निरोगी राजकारण त्यांना अपेक्षित आहे का?” असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.

हेही वाचा- “माझीच बॅट माझाच बॉल, मीच फिल्डर मीच अंपायर” उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची बोचरी टीका

पुढे त्यांनी म्हटलं की, “मला हेच कळत नाही की काल ते (उद्धव ठाकरे) म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कुणीही घेऊ नका. पण महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे आहेत. यामुळे हिंदू महासभा असेल, काँग्रेस असेल किंवा स्वत: प्रकाश आंबेडकर असतील, ते कधी म्हणाले का? की तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. ती आमची संपत्ती आहे. मूळात ही लोकं म्हणजे विचार आहेत. सन्मानीय बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार कुणाच्या मालकीचा असू शकत नाही. ती कुणाची वैयक्तिक संपत्ती असू शकत नाही” असंही देशपांडे म्हणाले.

केमीकल लोचा झालेल्या पक्षांनी शिंदे गटाला ऑफर दिली, असं अर्थाचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांचा बोलण्याचा रोख ‘मनसे’कडे होता. याबाबत विचारलं असता देशपांडे म्हणाले, “ज्यांचा राजकीय लोचा झालाय त्यांनी आमच्या केमीकल लोचावर बोलावं म्हणजे जरा हस्यास्पद आहे.”