विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पोलखोल महा पत्रकार परिषद आयोजित करून खुले न्यायालय भरविण्यात आले होते. या खुल्या न्यायालयावर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आलीच. त्याशिवाय मनसेनेही त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले की, मनसे कार्यकर्त्यांना आता चांगली संधी आहे. त्यांनी अशाचप्रकारे न्यायालय भरवून स्वतःची निर्दोष मुक्तता करून घ्यावी.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

संदीप देशपांडे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ते म्हणतात, “सर्व महाराष्ट्र सैनिकांवर अनेक ठिकाणी विविध खटले दाखल आहेत. मग ते रास्ता रोको आंदोलन असेल, कामगारांना न्याय देण्यासाठी केलेले आंदोलन असेल. भोंग्याच्या विरोधातले आंदोलन असेल. या आंदोलनाच्या वेळेस अनेकांच्या अंगावर केसेस टाकण्यात आल्या आहेत. या सर्व खटल्यातून दोषमुक्ती होण्यासाठी उबाठा गटाने काल आपल्याला एक युक्ती दिली. ती युक्ती म्हणजे जनता न्यायालय.”

“अनेकांना न्यायालयात वर्षानुवर्ष खटले लढवावे लागतात. न्याय मिळेल की नाही, ही अपेक्षा नसते. सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी त्यांच्या विभागातील शाखेमध्ये एक जनता न्यायालय भरवावे. आपल्या कार्यकर्त्यांवर जेवढे खटले असतील, त्या सर्वांववर जनता न्यायालयात सुनावणी घेऊन निर्दोष सुटका करून घ्यावी. गरज भासली तर आपल्या लिगल सेलच्या वकिलांना बोलवावे. म्हणजे आपलेच वकील, आपलेच न्यायालय आणि आपलाच निर्णय. मला वाटतं यापेक्षा चांगला मार्ग आपल्याला मिळू शकत नाही”, अशी खोचक टीका देशपांडे यांनी केली.

“आपल्यावरील सर्व गुन्हे या युक्तीमुळे मागे घेतले जातील आणि आपल्या सर्वांनाच वारंवार न्यायालयाच्या ज्या खेपा माराव्या लागतात, त्यातूनही सुटका होईल, असे आवाहन संदीप देशपांडे यांनी केले आहे.

“माझ्याकडून चुकीचं कृत्य…”, ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकरांचं वक्तव्य

उबाठा गटाच्या वतीने दि. १६ जानेवारी रोजी वरळीच्या डोम सभागृहात खुली पत्रकार परिषद भरविण्यात आली होती. याला उद्धव ठाकरेंनी जनतेचे न्यायलय म्हटले होते. यावेळी ठाकरे गटाचा खटला लढविणाऱ्या वकिलांची भाषणे झाली. पक्षाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी २०१३ आणि २०१८ साली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीचे आणि सभेचे दाखले दिले. तसेच उद्धव ठाकरेंनी त्यांची राजकीय भूमिका व्यक्त केली.

Story img Loader