मागील काही दिवसांपासून मनसे पक्षातील नेते चांगलेच सक्रिय झाले आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यापासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि सत्ताधारी शिंदे गट-भाजपा यांच्यात जवळीक वाढत चालली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतरही मनसेचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. असे असतानाच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. देशपांडे यांच्या ट्वीटचे अनेक अर्थ लावले जात असून मनसे आगामी काळात नेमके काय करणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
हेही वाचा >>> “कुटुंबाला वेदना झाल्या, मुलगी रडत होती, सुनेला धक्का बसला”, गिरीश महाजनांच्या विधानानंतर एकनाथ खडसे भावूक
मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी एक ट्वीट केले आहे. त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी सर्वांचा हिशोब होईल, असे ट्वीटद्वारे सूचक विधान केले आहे. मात्र २७ नोव्हेंबर रोजी नेमके काय होणार? याबाबतची माहिती देशपांडे यांनी दिलेली नाही. याच कारणामुळे मनसे या दिवशी नेमकं काय करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा
हेही वाचा >>> मुलाची हत्या झाली की आत्महत्या? गिरीश महाजनांच्या विधानानंतर खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले “गेस्ट हाऊसवरील भानगड…”
काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, असा दावा राहुल गांधींनी केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानानंतरही मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी मनसेने केली होती. तसेच राहुल यांची शेगाव येथील सभा उधळवून लावण्याचाही इशारा मनसेने दिला होता.
दरम्यान, आगामी पालिका आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता मनसेकडून पक्षबांधणीचे काम केले जात आहे. त्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी राज यांनी विदर्भाचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पक्षबळकटीकरणासाठी काय करता येईल, यावर चर्चा केली होती. पुढील महिन्यात म्हणजेच १ ते ९ डिसेंबरदरम्यान राज ठाकरे कोकणचा दौरा करतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राज ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर निघण्याअगोदर मनसे नेमकं काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.