MNS इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मनसेने आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान या चर्चा होत असतानाच राज ठाकरेंच्या मनसेने थेट सरसंघचालकांना पत्र लिहिलं आहे. हिंदी सक्ती नको असं यात संदीप देशपांडे यांनी नमूद केलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रात?

प्रति, मोहन भागवत
सरसंघचालक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
यांस सस्नेह जय महाराष्ट्र

महोदय,

खरं तर आपल्याला प्रत्यक्ष भेटून आमच्या भावना आपल्या समोर मांडाव्यात अशी आमची मनापासून इच्छा होती. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना भेटता येईल का? ही शंका आहे म्हणून हे खुलं पत्र आपल्याला लिहित आहे. हिंदुस्थानाचा इतिसाह आहे की मराठ्यांनी जवळ जवळ पूर्ण भारतावर राज्य केलं. इंग्रजांनीही हिंदुस्थान जिंकला तो मुघलांकडून नाही तर मराठ्यांकडून. होळकरांचे इंदूरमध्ये राज्य होते. शिंदे ग्वालियरमध्ये होते. गायकवाड बडोद्यात होते. दक्षिणतेल्या तंजावर या ठिकाणी मराठ्यांचं राज्य होतं. खर तर जवळ जवळ २०० वर्षे मराठ्यांचं अधिपत्य हिंदुस्थानवर होतं. एवढं असूनही मराठ्यांनी कधीही मराठी भाषा ही तिथल्या राज्यांवर लादली नाही. अगदी गुगल नसताना सुद्धा त्यांना मराठी संपर्काची भाषा करावीशी वाटली नाही. उलटपक्षी शिंदे ग्वालियरला जावून सिंधिया झाले.

हिंदू भाषेची सक्ती…

हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे सध्या शालेय शिक्षणात करण्यात आलेली हिंदी भाषेची सक्ती. मराठी माणूस सहिष्णू आहे याचा गैरफायदा घेतला जातो आहे. महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे, गुजरात मध्ये राहणारा माणूस गुजराती असूनही हिंदू आहे. तामिळ बोलणाराही हिंदू आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, बंग हे आपल्या देशाच्या राष्ट्रगीतात आहे. विविधेतून एकता हे नुसत्या देशाचं वैशिष्ट्य नाही तर आपल्या हिंदू धर्माचे सुद्धा वैशिष्ट्य आहे. ख्रिस्ती धर्म पाळणारे सगळेच इंग्रजी बोलत नाहीत. ते जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश इत्यादी भाषा बोलतात. अगदी भारतात तर ख्रिस्ती धर्म वाढवण्यासाठी त्यांनी तमिळ, मलल्याळण, कोंकणी या बोलीभाषा आत्मसात केल्या. ही सगळी उदाहरणं देण्याचं कारण धर्म वाढवायचा असेल, टिकवायचा असेल तर सर्वा भाषांना सामावून घेणं गरजेचं आहे. एका समूहाची भाषा दुसऱ्या समूहावर लादून धर्म वाढू शकत नाही. पाकिस्तानमधील बंगाली बोलणारे मुसलमान हे मुसलमान असूनही भाषेच्या सक्तीमुळे वेगळे राष्ट्र झाले हा ताजा इतिहास आहे. ज्या पद्धतीने सरकार हिंदी भाषेची सक्ती करुन हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि विचारांच्या आधारावर उभी राहिलेली ही संघटना आहे. म्हणूनच हे सगळं सांगण्याचं धाडस करीत आहे. हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्यच्या या कृतीला आपण चाप बसवाल हा आमचा विश्वास आहे, म्हणून हा पत्रप्रपंच. आपण जर वेळ दिल्लीत तर प्रत्यक्ष भेटून आपल्या समोर भावना व्यक्त करायला नक्की आवडेल.

धन्यवाद

आपला नम्र

संदीप देशपांडे
मुंबई शहर अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

असं पत्र संदीप देशपांडे यांनी लिहिलं आहे. आता मनसेच्या संदीप देशपांडेंनी लिहिलेल्या या पत्राला संघाकडून काही प्रतिसाद मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.