महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर मनसे-ठाकरे गटाची युती होण्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. अभिजीत पानसे राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांना भेटल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि अनेक खासदारांना बरोबर घेत नवा गट स्थापन केला. तसेच शिवसेनेचं चिन्ह आणि नावही मिळवलं. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. ३० हून अधिक आमदार आणि खासदारांना बरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला आहे. या गटाने पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला आहे. राज्यातल्या राजकारणाचा चिखल झाला असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र यावं अशी जनसामान्यांची इच्छा असल्याचं चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? दोन्हीपैकी कुठल्याही पक्षाकडून युतीचा प्रस्ताव आहे का? अशा अनेक प्रश्नांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तरं दिली आहेत. संदीप देशपांडे म्हणाले, “जनतेची भावना असणं आणि प्रत्यक्षात काही गोष्टी घडणं यात फरक आहे. अभिजीत पानसे यांनी घेतलेली संजय राऊतांची भेट ही वैयक्तिक होती. तिथे मी उपस्थित नव्हतो, तरी मला नाही वाटत की तिथे कोणतीही राजकीय चर्चा झाली असेल.” देशपांडे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
यावेळी देशपांडे यांना प्रश्न विचारण्यात आला की, मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव आहे का? यावर संदीप देशपांडे म्हणाले, असा कोणाताही प्रस्ताव आमच्याकडून देण्यात आलेला नाही. परंतु याआधी आम्ही २०१४ आणि २०१७ मध्ये युतीचा प्रस्ताव दिला होता. परंतु तेव्हा उबाठा गटाचा अत्यंत नकारात्मक प्रतिसाद होता. त्यामुळे आत्ता आम्ही प्रस्ताव द्यायचा विषयच येत नाही.
हे ही वाचा >> Video: “…तर आम्ही मागेपुढे पाहणार नाही”, अजित पवारांचं बंड पुन्हा मोडून काढण्याची सोनिया दुहान यांना खात्री; दिलं खुलं आव्हान!
दरम्यान, अभिजीत पानसे हे संजय राऊत यांना भेटल्यानंतर शिवतीर्थावर राज ठाकरे यांना भेटायला गेल्यामुळे या घटनेवरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत, त्याबद्दल काय सांगाल असा प्रश्न देशपांडे यांना विचारल्यावर संदीप देशपांडे म्हणाले, पानसे हे दादरला आले होते. दादरला आल्यावर ते राज ठाकरे यांना भेटायला येतातच. त्यात काही नवीन नाही.