केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘मशाल’ हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. नवीन नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नेते विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून शिंदे गटावर आणि भाजपावर निशाणा साधत आहेत.
दरम्यान, या महाप्रबोधन यात्रेत अद्याप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दिसल्या नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही किशोरी पेडणेकरांची खिल्ली उडवली आहे. शालिनी ठाकरे यांनी एक ट्वीट करत किशोरी पेडणेकरांवर टीकास्र सोडलं आहे. शिल्लक सेनेकडून मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपऱ्यांना संधी दिली जात असल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी किशोरी पेडणेकरांचा थेट उल्लेख न करता ही टीका केली आहे.
शालिनी ठाकरे ट्वीटमध्ये म्हणाल्या की, “अंधारात तीर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे. महाप्रबोधन यात्रेत त्यांना बोलावलं नाही, म्हणून त्यांनी पक्षप्रमुखांकडे तक्रार केली. पण काहीही उपयोग झाला नाही. मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपऱ्याना नवीन शिल्लक सेनेकडून संधी दिली जाते. हे अजब आहे.” अशी टीका शालिनी ठाकरे यांनी केली आहे.