लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही सपाटून मार खाव्या लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला(मनसे) धक्क्यावर धक्के बसत असून नाशिक या बालेकिल्ल्यातील मनसेचे खंदे शिलेदार वसंत गीते यांनी आपल्या प्रदेश सरचिटणीस पदाचा सोमवारी राजीनामा दिला आहे.
गीतेंसोबत जिल्हाध्यक्ष समीर ठाकरे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मनसेचे १८ नगरसेवक देखील राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक महापालिकेत सत्ता असूनही विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हेच वसंत गीते आणि समीर ठाकरे यांच्या राजीनाम्याचे कारण असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, ‘मी पक्ष सोडणार नाही. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार आहे’, असे गीते यांनी सांगितले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नियोजित नाशिक दौऱयाच्या आधीच हे राजीनामा सत्र सुरू झाल्याने मनसेमध्ये खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात मनसेला आलेल्या अपयशाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे सध्या राज्यव्यापी दौऱयावर आहेत. त्यानुसार ५ नोव्हेंबर रोजी ते नाशकात येणार होते परंतु, मुलगी उर्वशीला अपघात झाल्याने राज यांनी आपला दौरा पुढे ढकलला आहे. त्यात राज येण्याआधीच वसंत गीते आणि समिर ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नाशिक मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सोबत नाशिकमध्ये आणखी काही महत्त्वाचे पदाधिकारी राजीनाम्याच्या पावित्र्यात असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा