Vasant More Facebook Post : पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ यांच्यात ऑल इज नॉट वेल असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट. वसंत मोरेंनी रात्री १२ वाजता एक पोस्ट लिहिली आहे. ज्या पोस्टची आता जोरदार चर्चा सुरु आहे. यानंतर वसंत मोरे पक्षाला रामराम करणार का? याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

वसंत मोरे हे पुण्यातले मनसेचे धडाडीचे नेते आहेत. एखादी समस्या आली, कुठे काही अन्याय होताना दिसला तर त्या ठिकाणी हजर राहून ते लोकांच्या अन्यायाला, समस्येला वाचा फोडतात हे बऱ्याचदा दिसलं आहे. लोकांमध्ये ते याचमुळे प्रसिद्ध आहेत. इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरेंना पक्षात कुणाचा त्रास होतो आहे? त्यांची ही खदखद अशी का बाहेर येते आहे? हे प्रश्न आता त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे उपस्थित होत आहेत.

काय आहे वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट?

“एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो.” ही पोस्ट वसंत मोरेंनी लिहिली आहे.

Vasant More FB Post
वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत.

हे पण वाचा- मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, म्हणाले, “मी राज मार्गावर…”

काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात जाणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. वसंत मोरे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. नाशिकच्या मेळाव्यात त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती. या सगळ्या घडामोडी आधी घडलेल्या असतानाच त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.