काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर मनसेने शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखली नाक्यावर रोखलं आहे. यानंतर त्या ठिकाणीच मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजीही सुरू झाली. दरम्यान पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, दिलीप बापू धोत्रे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
यावेळी नितीन सरदेसाई म्हणाले,“ पोलिसांकडे कोणतेही आदेश नाहीत. लोकाशाहीच्या मार्गाने निषेध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमचे विविध ठिकाणाहून कार्यकर्ते आलेले आहेत, सभेच्या ठिकाणी ते पोहचतील. पोलीस अन्यायकारक पद्धतीने आम्हाला इथे थांबवत आहेत. आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही.”
कुठल्या गोष्टीला राहुल गांधी घाबरले आहेत? – संदीप देशपांडे
याचबरोबर संदीप देशपांडे यांनी , “आज लोकशाहीची दडपशाही झाली. काँग्रेसवाले घाबरले म्हणून त्यांनी पोलिसांना मध्ये आणलं. काँग्रेस का घाबरली आहे, कुठल्या गोष्टीला राहुल गांधी घाबरले आहेत?, जोपर्यंत आम्हाला शेगावला जाण्याची परवानगी देत नाहीत किंवा त्यांना काय आदेश देण्यात आला आहे, हे दाखवत नाहीत. तोपर्यंत आमचं हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार. आमचा शेवटचा कार्यकर्ता इथे असे पर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत. आमचा निषेध आम्ही दाखवला आहे, त्यांनी त्याचं काम करावं. आम्ही कुठल्याही दडपशाहीला घाबरणार नाही.” अशी प्रतिक्रिया दिली.
शेगावात अगोदरच मनसे कार्यकर्ते पोहचलेले आहेत –
याशिवाय, “आम्ही सनदशीर मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने हे आंदोलन करण्यासाठी आलो होतो. मात्र पोलिसांनी आम्हाला जाणूनबुजून अडवलेलं आहे. परंतु हजारोंच्या संख्येने मनसे कार्यकर्ते पोहचलेले आहेत. त्या ठिकाणी १०० टक्के निषेध होणार, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही आणि जनता कधीही माफ करणार नाही.” असं औरंगाबादचे जिल्हाधियक्ष दिलीप धोत्रे यांनी सांगितलं.