मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने फेसबूक लाईव्ह करून आपल्याला मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बेदम मारहाण केल्याचा दावा केला आहे. महेश जाधव असं या पदाधिकाऱ्याचं नाव असून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या कपाळावरून ओघळणारं रक्त दिसतंय, तसेच त्यांच्या चेहऱ्याला झालेली दुखापतदेखील स्पष्ट दिसत आहे. महेश जाधव यांनी दावा केला आहे की, “माथाडी संघटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो होतो. तिथे मला अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली.” दरम्यान, या मारहाणीनंतर जाधव यांना खारघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश जाधव यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, मी काही माथाडी कामगारांना घेऊन न्याय मागण्यासाठी अमित ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काचं काम मिळावं यासाठी मी भांडत होतो. परंतु, अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मित्र विनय अग्रवाल याच्या सांगण्यावरून मला मारहाण केली. मी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंना एवढंच सांगेन, मला मारायचं असेल तर जीवे मारा पण मी तुमच्यापैकी कोणालाही सोडणार नाही. सतत मराठी-मराठी करायचं आणि मराठीच्या नावाखाली आपल्याच माणसांवर अन्याय करायचा, असं सगळं त्यांचं चालू असतं.

महेश जाधव म्हणाले, हे ठाकरे मराठी माणसाचे कैवारी नाहीत. हे थोतांड आणि दलाल आहेत. राज ठाकरेंचा पक्ष दलाल आहे. हा केवळ वसुली करणारा पक्ष आहे. या फेसबूक लाईव्हनंतर ते लोक माझा जीव घेतील, मला मारून टाकतील. राज आणि अमित ठाकरे यांच्या लोकांनी मला राजगड (पक्ष कार्यालय) येथे मारहाण केली. मी तिथून कसाबसा जीव वाचवून पळून आलोय. या माथाडी कामगारांनी मला वाचवलं आणि तिथून पळवून आणलं.

हे ही >> “३४ याचिका, दोन लाख पानं, त्यामुळे…”, आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकरांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “आमचा प्रयत्न…”

संदीप देशपांडे यांनी मांडली मनसेची भूमिका

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याप्रकरणी पक्षाची भूमिका मांडली आहे. संदीप देशपांडे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी फोनवरून बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, महेश जाधव यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. हा प्रकार घडला तेव्हा मी तिथे नव्हतो. परंतु, मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अमित ठाकरेंकडे महेश जाधव यांच्या अनेक तक्रारी येत होत्या. कामगारांची फसवणूक करणे, कामगारांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी अमित ठाकरे यांनी बोलावलं होतं. परंतु, जाधव काही कामगारांना घेऊन तिथे गेले आणि अमित ठाकरे यांना उलटसुलट उत्तरं देऊ लागले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले महाराष्ट्र सैनिक संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना मारहाण केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mahesh jadhav claims amit thackeray tried to kill him video viral sandeep deshpande exlains asc