* नांदेडमध्ये बस जाळली,
* परभणीत दगडफेक,
* हिंगोलीत राष्ट्रवादी नेत्यावर हल्ला
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. तत्पूर्वी मराठवाडय़ात मनसे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बसवर दगडफेक केली, तर नांदेड जिल्ह्य़ात एक बस जाळण्यात आली. हिंगोलीत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ला करण्यात आला.
मराठवाडय़ात विविध तालुक्यांच्या ठिकाणीही निषेध व दगडफेकीच्या घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. सायंकाळी औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांचे आगमन झाले. कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात त्यांचे जंगी स्वागत केले. या सर्व घटनांवर राज यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राडा केल्याच्या वृत्ताने उशिरापर्यंत पोलिसांना गस्त वाढवावी लागली.
सोलापूर येथील सभेनंतर राज ठाकरे पुढे गेले, तेथे-तेथे निदर्शने होत होती. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवराळ भाषेच्या विरोधात निदर्शने करायला सुरुवात केल्यानंतर नगर येथे राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठवाडय़ात सर्वत्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसना लक्ष्य केले. नांदेड जिल्ह्य़ातील भोकरमध्ये बस जाळण्यात आली. यात १३ लाखांचे नुकसान झाले.
नांदेड शहरात माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांच्या मुलाच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. लोहा येथे आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या संपर्क कार्यालयासमोरचे बॅनर फाडले. लोहा-कंधार रस्त्यावर दगडफेक झाली. वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल केले जात असून मनसेच्या ३० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
परभणी जिल्ह्य़ात राष्ट्रवादी कार्यालयात दगडफेक झाली व तीन बस फोडण्यात आल्या. बीड जिल्ह्य़ातील केज येथे अजित पवार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला, तर माजलगाव तालुक्यात ५ गाडय़ांवर दगडफेक झाली.
हिंगोलीचे माजी खासदार व राष्ट्रवादीचे नेते शिवाजी माने, माजी खासदार विलास गुंडेवार, आमदार जयप्रकाश दांडेगावकर व नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या घरावर एका जमावाने दगडफेक केली. दरम्यान, हिंगोलीत सात जणांना अटक करण्यात आली.
मराठवाडय़ात मनसेचा राडा!
* नांदेडमध्ये बस जाळली, * परभणीत दगडफेक, * हिंगोलीत राष्ट्रवादी नेत्यावर हल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. तत्पूर्वी मराठवाडय़ात मनसे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बसवर दगडफेक केली, तर नांदेड जिल्ह्य़ात एक बस जाळण्यात आली.
First published on: 28-02-2013 at 03:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mess in marathwada