महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मान मिळत नाही. राजकीय विरोधकांना आघाडीच्या नावाखाली पाठबळ दिले जाते, अशी कारणे पुढे करीत कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (बुधवारी) विधानसभा अध्यक्षांकडे विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी दूरध्वनीवर बोलताना सांगितले. राजकीय निर्णयाबाबतची माहिती देण्यासाठी कन्नड येथे त्यांनी कार्यकर्त्यांची सोमवारी विशेष बैठक घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घुसमट होत आहे. वेगवेगळय़ा निर्णयांसाठी दबाव आणला जातो. कन्नड मतदारसंघाचा विचार न करता राजकीय सोयीचे निर्णय लादले जातात, अशी जुनीच तक्रार आमदार जाधव यांनी सांगितली. औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेची आघाडी आहे. सत्ता मिळविताना कन्नड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उदयसिंह राजपूत यांच्या पत्नीला सभापतिपद देण्यास आमदार जाधव यांचा विरोध होता. हा विरोध त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावरही घातला. पंचायत समितीचे सभापती व उपसभापती नेमतानाही असाच दबाव आणला गेल्याने ते वैतागले असल्याचे सांगतात. उदयसिंह राजपूत यांनी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कन्नड तालुक्यात राष्ट्रवादीची कशी घोडदौड सुरू आहे, हे पत्रकारांना आवर्जून सांगितले होते. पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती, ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे बळ वाढत असल्याचे सांगताना त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली होती.
पिशोर येथील हिराजी साखर कारखान्याबाबत सतत भावनिक राजकारण केले जाते, असा आरोपही राजपूत यांनी केला होता. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर आमदार जाधव हैराण होते. राज्यस्तरीय नेत्यांकडून घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा मिळत नसल्याने या पक्षात राहणे शक्य नसल्याचे त्यांनी मंगळवारी पुन्हा सांगितले. या पूर्वीही त्यांनी एकदा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मनसेला सोडचिठ्ठी देताना या वेळी विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा आज राजीनामा?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मान मिळत नाही. राजकीय विरोधकांना आघाडीच्या नावाखाली पाठबळ दिले जाते, अशी कारणे पुढे करीत कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 09-01-2013 at 03:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla harshvardhan jadhav resign