महाराष्ट्रामध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर मराठी नंबर प्लेट लावल्याने होत असणारी कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांनी यासंदर्भातील एक पत्रच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठवलं आहे. यासंदर्भात राजू पाटील यांनीच सोशल नेटवर्किंगवर पत्राचा फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी द्यावी व महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी, असं या पत्रामध्ये राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> ‘ओ काका आमचा फोटो काढा ना’ म्हणत मरिन ड्राइव्हवर फिरायला आलेल्या मंत्र्याच्याच हाती दिला मोबाईल, अन्…

राजू पाटील यांनी  परिवहन मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये हे पत्र महाराष्ट्रात गाड्यांना लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर सुरु असलेली कारवाई तत्काळ थांबविण्याबाबत असल्याचं म्हटलं आहे. “महाराष्ट्रात विविध गाड्यांवर मराठी भाषेत नंबर प्लेट लावलेल्या आहेत. सदर गाड्यांवर आरटीओकडून कारवाई करुन दंड वसुली करण्यात येत आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर कारवाई होत असल्याने मराठी जनांमध्ये तीव्र नाराजी परसरली आहे,” असं राजू पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

पुढे राजू पाटील यांनी, “मराठी भाषा संवर्धन व मराठी अस्मितेबाबत माजी परिवहन मंत्री व ज्येष्ठे नेते दिवाकर रावते सभागृहात व विविध स्तरावर वेळोवेळी आग्रही भूमिका घेताना दिसले. त्यांनीच २०१६ मध्ये वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत दुचाकीसह सर्व गाड्यांवर मराठी प्लेट लावण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आजही सदर व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहे. पंरतू आज अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे की, महाराष्ट्रात ‘मराठी अस्मिता’ जपणाऱ्यांवर कारवाई करुन सरकार दंड वसूल करीत आहे,” असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे.

मराठी नंबर प्लेटसाठी दंड आकारणे म्हणजे मराठी भाषेची गळचेपी केली जात असल्याचेही राजू पाटील यांनी म्हटलं आहे. “वास्तविक महाराष्ट्रात मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्याबाबत राज्य शासन आग्रही असले पाहिजे होते. तसा कायदाच महाराष्ट्रात केला पाहिजे होता. परंतु तसे न करता सरकारकडून मराठी नंबर प्लेटवर कारवाई करुन सोयीस्कर आपल्याच मातृभाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशाप्रकारे मराठी भाषेची सरकारकडूनच गळचेपी होत असेल तर भाषेचे संवर्धन व आपली मराठी अस्मिता कशी जपली जाईल, असा प्रश्न निर्माण होतो,” असं राजू पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे.

पत्राच्या शेवटी राजू पाटील यांनी, “तरी आपण याबाबत तातडीने दखल घेऊन मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी घ्यावी व महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी,” अशी विनंती परिवहन मंत्र्यांना केलीय.

या ट्विटमध्ये राजू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही टॅग केलं आहे.