शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड या नवीन सहकाऱ्याला घेऊन आपण खांद्याला खांदा लावून लढणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या या युतीवर मनसेने टीका केली आहे. मनसे आमदार राजू पाटील (raju patil) आणि मनसे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे (kirtikumar shinde) यांनी ट्वीट करत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
हेही वाचा- “हेच उद्धवसाहेबांनी केलं असतं तर…”, शिवसेनेची फडणवीसांवर टीका
सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…, असं ट्वीट करून राजू पाटील यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. युतीनंतर शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच आता मनसेनेही या युतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. मनसे नेते गजानन काळे यांच्यापाठोपाठ मनसे आमदार राजू पाटील यांनी ही जोरदार टीका केली आहे.
मनसे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांचे ट्वीट
‘ए ग्रेड ‘ठाकरी’ राजकारणाला सोडचिठ्ठी. बी ग्रेड ‘आखरी’ राजकारणाशी हातमिळवणी. मऱ्हाठा ते मराठा… विचारांशी नाळ जुळलेलीच नसेल तर अत्यंत वेगाने युती/आघाडीसाठी झेड ग्रेडपर्यंत येतील! येतील म्हणजे यायचंच!! किंबहुना, पोहोचायचंच’ असं ट्वीट करत शिंदे यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर टीका केली आहे.
संभाजी ब्रिगेडसोबत युती करताना काय म्हणाले उद्धव ठाकरे</strong>
संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. “आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, अशी प्रतिक्रियाही दिली.