महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे यांनी आता वंचित बहुजन आघाडीलाही सोडचिठ्ठी दिली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघामधून वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी स्वीकारलं नाही, असं कारण सांगत आता वसंत मोरे लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. त्यानंतर आपण ९ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितंल.

वसंत मोरे यांनी मनसेनंतर आता वंचित बहुजन आघाडीलाही रामराम ठोकल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वसंत मोरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “वसंत मोरेंना मनसे सोडल्याचा पश्चात्ताप नक्की होईल. कारण आता त्यांना नेतृत्वही फेसबुक लाईव्हचं भेटलं आहे”, असा खोचक टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लगावला आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

राजू पाटील काय म्हणाले?

विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना राजू पाटील म्हणाले, “विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करता आली असती. मात्र, कुठेतरी काही लोकांना वाटत असेल की विधानपरिषदेची निवडणूक व्हावी आणि आपली शक्ती तपासून घ्यावी. ही निवडणूक आगामी काळातील कदाचित लिटमस टेस्ट ठरू शकते. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असावी”, असं राजू पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा : “आपली विकेट तर जाणार नाही ना?”, काल मुंबईत झालेल्या गर्दीवर बोलताना फडणवीसांचं मोठं विधान

मनसे महायुतीबरोबर आहात का?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत मनसे महायुतीबरोबर राहणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता राजू पाटील म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेने पाठिंबा दिला होता. आता राज ठाकरे जो आदेश देतील त्यांना मी मतदान करणार आहे. कारण या निवडणुकीत जे मित्र पक्ष आहेत, त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे”, असं राजू पाटील म्हणाले.

वंसत मोरेंना खोचक टोला

वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडत आता ते लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यावर बोलताना राजू पाटील म्हणाले, “वसंत मोरे यांची काय भूमिका आहे? यावर मी बोलण्यापेक्षा त्यांना मनसे सोडल्याचा पश्चात्ताप नक्की होणार आहे. मनसेत जे प्रेम मिळत होतं, जनाधार मिळत होता तो तिकडे नाही. आता वंसत मोरे यांना नेतृत्वही फेसबुक लाईव्हचं भेटलं आहे. वंसत मोरे यांच्याशी मिळतं जुळतंच नेतृत्व त्यांना भेटलं आहे. त्यामुळे ते थोड्या दिवस तेथे व्यवस्थित राहतील”, असा टोला राजू पाटील यांनी वंसत मोरेंना लगावला आहे.