गुरुपौर्णिमेनिमित्त आज वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज अभिवादन केले. राज्यात वेगवेगळ्या नेत्यांनीही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या गुरुला अभिवादन केले आहे. दरम्यान, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील राज ठाकरे यांना आपला राजकीय गुरू मानत त्यांच्याप्रतीचा आदर व्यक्त केला आहे. राज यांच्या पावलावर पाऊल ठेवत इथपर्यंत पोहोचलो आहे, असे राजू पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> गुरुपौर्णिमा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभीनाका येथील आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होणार
“राजकारण करायचं ते फक्त जनतेसाठीच. झटायचं ते मराठीसाठीच. लढायचं ते हिंदुत्वासाठीच ! हाच कानमंत्र मा. राजसाहेबांकडून घेतला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, आजवर इथपर्यंत पोहोचलोय. माझे राजकीय गुरु ‘हिंदूजननायक’ मा.श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांस गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन,” असे राजू पाटील ट्वीटच्या माध्यमातून म्हणाले आहेत.
राजू पाटील मनसे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. विधिमंडळात पक्षाचे नेतृत्व करणारे ते एकमेव प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना पक्षात खास महत्त्व आहे. मागील काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा यांच्यात सलगी वाढलेली आहे. त्यामुळे विद्यमान शिंदे सरकारमध्ये राजू पाटील यांना मंत्रीपद मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना राजकीय गुरु माणणाऱ्या राजू पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान मिळते का? ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा >>> राष्ट्रपती निवडणूक : “…तर चांगले झाले असते”, द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा देताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे जाऊन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.