राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळावा आणि त्यानंतर १२ एप्रिल रोजी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मांडलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण सुरू झालं आहे. ठिकठिकाणी हनुमान चालीसा वाजवली जात आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना मनसेनं त्यांचं नाव न घेता प्रतिटोला लगावला आहे.
इस्लामपूरच्या सभेत बोलताना अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना एका दमात हनुमान चालीसा म्हटल्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. याच सभेमध्ये अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात…चांगला टाइमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं,” असा टोला त्यांनी लगावला.
“मटण करी” म्हणत टोला…
दरम्यान, अमोल मिटकरींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मिटकरींचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दांत ट्वीट केलं आहे. संदीप देशपांडेंनी ट्वीटमध्ये राष्ट्रवादीची मटण करी असा उल्लेख केला आहे.
“राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून.. ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेव्हा चड्डीत राहायचं, काय समजलं?” असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
राज ठाकरेंचा अल्टिमेटम, राज्य सरकार मात्र ठाम
एकीकडे राज ठाकरेंनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं असताना भोंगे काढण्यासाठी ३ मेचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिलेला असताना सरकारने देखील असं काहीही करता येणार नसल्याचं स्पष्ट करत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.