नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकीकडे काँग्रेसचं पानिपत झाल्याचं चित्र निर्माण झालं असताना दुसरीकडे शिवसेनेला देखील आपला ठसा उमटवता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं या निवडणुकांमधून काय कमावलं आणि काय गमावलं? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांमध्ये दौरे काढून जोरदार प्रचार केला होता. मात्र, त्याचं रुपांतर मतांमध्ये न झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.
“झुकेगा नहीं साला…”
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शनिवारी यासंदर्भात खोचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पुष्पा सिनेमातला डायलॉग देखील नमूद केला आहे. “उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर ‘सामनाकार’ रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना. झुकेगा नहीं साला”, असं संदीप देशपांडे या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये सात टप्प्यांत झालेल्या मतदानाचे निकाल १० मार्च रोजी लागले. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये भाजपानं एकहाती सत्ता मिळवली आहे. गोव्यामध्ये भाजपानं अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना धोबीपछाड देत आपनं बाजी मारली आहे. शिवसेनेनं उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना तिथे अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही.