राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आयोजित मनसेच्या मोर्चाला मोठय़ा प्रमाणात सदस्य व कार्यकर्ते रवाना झाल्याने शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्याभरातील बस वाहतूक मोठय़ा प्रमाणावर विस्कळीत झाली. मुंबई रेल्वेच्या तांत्रिक अडचणी व ट्रॅकची अनुपलब्धता यामुळे ऐनगर्दीच्या वेळी रेल्वेचे वाहतूक कोलमडली. मनमाडहून सुटणारी राज्यराणी एक्स्प्रेस रद्द झाली तर काही गाडय़ांचा मार्ग ऐनवेळी बदलण्यात आला. एकाचवेळी निर्माण झालेल्या गोंधळाने रस्ते वाहतुकीचे पुरक व मध्यवर्ती केंद्र असलेल्या मनमाडसह नाशिक रेल्वे स्थानकावर हजारो चाकरमाने, विद्यार्थी व्यापारी व प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. रेल्वे वाहतूक काही प्रमाणात सुरू असली तरी एस. टी. वाहतुकीला दिवसभर मोठा ब्रेक लागला होता.
आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने शुक्रवारी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील चालक, वाहक व कर्मचारी गेले होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच अनेक आगारांचे काम जवळपास ठप्प झाले. दुपारी चार वाजेपर्यंत ३५ ते ४० टक्के बस वाहतूक ठप्प झाल्याचे दिसत होते. बहुतांश आगारांच्या अनेक नियमित फे ऱ्या चालक नसल्याने रद्द कराव्या लागल्याने मनमाड, पुणे, शिर्डी नगर, धुळे, शेगाव, भुसावळ, नाशिक, औरंगाबाद तसेच लांब पल्ल्याच्या अनेक बसफे ऱ्या रद्द झाल्या. ग्रामीण भागातील बससेवेतील बसला सुमारे ३५ बसगाडय़ा दुपारर्प्यत मार्गस्थ झाल्या नाही. मात्र, मनमाड आगाराच्या कारभारावर ५० टक्के परिणाम झाल्याचे जाणवत होते. येथून सुमारे ८० कर्मचारी मोर्चाला रवाना झाल्याचे समजते. अशीच स्थिती बहुतेक आगारांची होती. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. डेपोत बसेस केवळ उभ्या होत्या तर स्थानकात दुपारनंतर शुकशुकाट दिसून आला.
बस वाहतुकीचा असा बोजबारा उडाला असताना विस्कळीत रेल्वे वाहतुकीने प्रवाशांचे हाल झाले. मुंबईतून उद्भवलेली रेल्वे संचालन प्रणालीतील तांत्रिक अडचण, मार्गाची अनुपलब्धता यामुळे स्थानकातून पहाटे पाचला सुटणारी मनमाड-कुर्ला राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. मनमाड-मुंबई पंचवटी सुपरफास्ट ही देखील मार्गस्थ होणार की नाही, यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ झाला होता अखेर ती गाडी ४५ मिनिटे उशिराने मनमाड स्थानकावरून रवाना झाली. मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व रेल्वेगाडय़ा एक ते दीड तास विलंबाने धावत होत्या. ऐनवेळी राज्यराणी राहू झाल्याने स्थानकात एकच गर्दी झाली. ऐनवेळी राज्यराणी अडचणीमुळे भुसावळ-पुणे व्हाया पनवेल ही गाडी देखील मार्गे पुण्याला मार्गस्थ करावी लागली.