MNS Leader Sandeep Deshpande : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या तारखा अधांतरित असल्या तरीही या वर्षी पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत पराभूत झालेले पक्ष पालिकेच्या निवडणुकीकरता आतापासूनच जोर लावत आहेत. विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून आणू न शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पक्षबांधणीला महत्त्व दिलं असून राज ठाकरेंनीही बैठकांना जोर दिला आहे. दरम्यान, मनसेत आता फेरबदल करण्यात आले असून काही नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा आढावा घेतला. तसेच यावेळी मनसेत काही नवीन पदांची घोषणा करत ही जबाबदारी काही पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरे यांनी सोपवली आहे. यामध्ये मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसंच, संदीप देशपांडे यांच्यावर मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

येत्या निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दिसेल

मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले, “मला असं वाटतं मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्षपद निर्माण केलंय. त्यामुळे आनंद तर आहेच, पण जबाबदारी असल्याने टेन्शनही आहे. जिद्दही आहे की एक चांगला परफॉर्मन्स येणाऱ्या महापालिका निवडणुकीत दिसेल. आजपासून मिशन मुंबई महापालिका निवडणुकीला सुरुवात झाली आहे.”

तसंच, येणाऱ्या सहा महिन्यात मनसेचं वेगळंपण दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील तीन विभागांची जबाबदारी कोणावर?

“कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शीव या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. पश्चिमेकडच्या विभागाची जबाबदारी कुणाल माईनकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे, तसेच पूर्वेकडच्या विभागाची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आता या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या चौकटीत काम करायचं? याची सर्व माहिती त्यांना दिली जाईल”, असं राज ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

Story img Loader