ठाण्यातील पाच ठिकाणच्या टोलनाक्यावर झालेल्या शुल्कवाढीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या टोलवाढीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव हे काही सहकाऱ्यांसह उपोषणाला बसले होते. दरम्यान, टोल शुल्कवाढीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. शिवसेना-भाजपा युतीने महाराष्ट्र टोलमुक्त करू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र महाराष्ट्र टोलमुक्त झाला नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
राज ठाकरेंच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र टोलमुक्त झाल्याचं विधान केलं. फडणवीसांच्या या विधानावरून मनसेनं खोचक टीका केली. देवेंद्र फडणवीसांचा संबंधित व्हिडीओ शेअर करत मनसेनं त्यांचा उल्लेख ‘भाजपकुमार थापाडे’ असा केला. मनसेनं ‘एक्स’ खात्यावरून केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे.
हेही वाचा- “…मग शरद पवार मेणाचा पुतळा आहेत का?” संजय राऊतांचा सवाल, नेमकं काय म्हणाले?
संबंधित व्हिडीओत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही तेव्हा जी घोषणा केली होती. त्यानुसार, राज्यातील सर्व टोलवर चारचाकी वाहनं आणि इतर लहान गाड्यांना आम्ही टोलमुक्ती दिली आहे. केवळ व्यावसायिक मोठ्या गाड्यांवरच टोल आकारला जात आहे.”
हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत
देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर करत मनसेनं पोस्टमध्ये म्हटलं, “महाराष्ट्र टोलमुक्त झाला आणि हे महाराष्ट्रालादेखील कळलं नाही. किती भूलथापा माराल? खरंच राज ठाकरेंनी जे नाव ठेवलं होतं ते अगदी चपखल आहे… भाजपकुमार थापाडे!”