Raj Thackeray Gudi Padwa Melava Speech Mumbai : मनसेच्या पाडवा मेळाव्याची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळाली. राज ठाकरे यावेळी काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सध्याच्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंच्या आधी भाषणात बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, मनसेचे नगरसेवक फोडताना तुम्हाला लाज वाटली नाही का? असा सवालही संदीप देशपांडेंनी उपस्थित केला.
“मनसेनं इतकी वर्षे संघर्ष केला. इतर पक्षांनी तो केला नाही. हार-जीत होत असते. तरीही मनसेचा कार्यकर्ता डगमगला नाही. ही शिकवण राज ठाकरेंनी दिली. राज ठाकरेंनी जे काही मिळवलं ते स्व कर्तृत्त्वावर मिळवलं. कुणाचा तरी मुलगा म्हणून आम्हाला काही मिळालेलं नाही”, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.
“…मग रडायला येतं”
“मुलगा म्हणून मिळालं असलं, की मग रडायला होतं की पाठीत खंजीर खुपसला, आम्हाला फसवलं, यांना खोके दिले वगैरे. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. जेव्हा अमित ठाकरे आजारी होते तेव्हा प्रत्येकी पाच कोटी देऊन मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही का? तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म? आता कशासाठी रडत आहात?” अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
“यश-अपयशाची पुन्हा व्याख्या करावी लागेल”
“मनसेला जे यश मिळालं, ते बाळासाहेब ठाकरे हयात असताना २००९ आणि २०१२ ला मिळालं आहे. ते यश राज ठाकरेंमुळे, आपल्या कामामुळे मिळालं. २०१४, १७, १९ ला अपयश आलं असेल. पण अपयश आणि यश आपण कोणत्या तराजूमध्ये मोजायचं? शिवसेनेचे ५६ आमदार आले, त्यातले ४० फुटले. तुमचं यश की अपयश? आमचा एकच आहे राजूदादा. पण एकही है, लेकिन काफी है. तुमचे ५६ येऊन उपयोग काय? यश आणि अपयशाची व्याख्या आपल्याला करावी लागते”, असंही संदीप देशपांडे म्हणाले.
“तुमच्यात ती हिंमत होती का?”
“काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष भाजपाला घाबरत होते. ते मनसेला विचारतात २०१४ला तुम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलात आणि २०१९ला त्यांच्या विरोधात प्रचार केलात. पण आम्ही जेव्हा योग्य वाटलं, जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा स्तुती केली. जेव्हा चुकीचं काम केलं तेव्हा लाव रे तो व्हिडीओ दाखवून महाराष्ट्राला खरी परिस्थिती दाखवली. तुमच्यात ती हिंमत होती का?” असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे.
“२०१९ला तुम्ही वेगळी निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या मांडीत जाऊन बसले. ५ वर्ष केलं काय? तर राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. पाच वर्षांत तो बाहेर काढला नाही. २०१९ला पुन्हा त्याच पक्षासोबत लोकसभेत युती केली.जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळवता येऊ शकतं, तेव्हा तुम्ही वेगळे झालात आणि शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात. एवढ्या भूमिका बदलणारे तुम्ही आम्हाला विचारताय? हे विचारतानाही लाज वाटली पाहिजे तुम्हाला”, असंही संदीप देशपांडे म्हणाले.