MNS Party Performance in Maharashtra Vidhan Sabha Election: यंदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात राजकीय सत्तासमीकरणं वेगळ्या पद्धतीने बदलू लागली आहेत. सर्वच अंदाज फोल ठरवत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रात महायुतीला २३५ जागा मिळाल्या असून एकट्या भाजपाला १३२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं असून महाविकास आघाडीची अवघ्या ४९ जागांवर मोठी पीछेहाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भवितव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मनसेची मान्यताच रद्द होण्याची शक्यता असून त्यासंदर्भातल्या निकषांवर विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसेंनी भाष्य केलं आहे.
का रद्द होऊ शकते मनसेची मान्यता?
अनंत कळसेंनी एबीपीशी बोलताना पक्षमान्यतेच्या निकषांची माहिती दिली आहे. तसेच, या निकषांमध्ये मनसे पक्षाची विधानसभा निवडणुकीतली कामगिरी बसत नसल्याचं सांगत त्यांना आयोग नोटीस पाठवू शकतो, असंही ते म्हणाले आहेत.
“एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल, तर त्याला निवडणूक आयोगाचे काही निकष पूर्ण करावे लागतात. त्यानुसार त्या पक्षाला एकूण ८ टक्के मतदान आणि १ जागा किंवा २ जागा आणि ६ टक्के मतदान किंवा ३ जागा आणि ३ टक्के मतदान यापैकी एक निकष त्या पक्षानं पूर्ण करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात अंदाजे ९.७० कोटी मतदार आहेत. आपण ६ कोटी लोकांनी प्रत्यक्ष मतदान केलं असं मानलं, तरी मला वाटत नाही की मनसेनं हा निकष पूर्ण केला आहे”, असं कळसे म्हणाले.
“मनसेची एकही जागा आलेली नाही आणि ४८ लाख मतं मनसेला निश्चितच मिळालेली नाहीत. ही तपासणी करून आयोग मनसेला नोटीस देईल आणि ‘आपल्या पक्षाची मान्यता का काढण्यात येऊ नये’, हे विचारलं जाईल. निकषात न बसल्यास मनसेची मान्यता काढली जाईल”, असंही ते म्हणाले.
मान्यता रद्द झाली तर काय होईल?
दरम्यान, मनसेची मान्यता रद्द झाली तर त्याचा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काय परिणाम होईल? पक्षाच्या कामकाजावर काही परिणाम होईल का? यावरही अनंत कळसेंनी माहिती दिली आहे. “मान्यता काढली म्हणजे मनसेचं नाव वगैरे काढलं जाणार नाही. त्यांचं चिन्ह इंजिन निश्चित आहे. ते त्यांना प्रत्येक निवडणुकीत कायद्यानं मिळतं. पण मान्यता रद्द झाल्यास यापुढे त्यांना ते चिन्ह मिळू शकणार नाही. त्यांना दुसरं एखादं चिन्ह घ्यावं लागेल. एवढाच फरक पडेल”, असं ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी…
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १.५५ टक्के मतं मिळाली. मनसेचा एकही उमेदवार विधानसभेत निवडून आला नाही. त्यामुळे मनसेच्या मान्यतेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मनसेच्या २६ उमेदवारांना १ हजाराहून कमी मतं मिळाली.
१ ते २ हजार मतं मिळवणारे २५ उमेदवार
२ ते ३ हजार मतं मिळवणारे १६ उमेदवार
३ ते ४ हजार मतं मिळवणारे ५ उमेदवार
४ ते ५ हजार मतं मिळवणारे ६ उमेदवार
५ ते १० हजार मतं मिळवणारे १८ उमेदवार
१० ते २० हजार मतं मिळवणारे १५ उमेदवार
२० ते ५० हजार मतं मिळवणारे १३ उमेदवार
५० हजारांवर मत मिळवणारा फक्त एक उमेदवार
भाजपानं एकटं पाडलं – प्रकाश महाजन
दरम्यान, भाजपानं पक्षाला एकटं पाडल्याची प्रतिक्रिया मनसेकडून व्यक्त करण्यात येत आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “आशिष शेलार व फडणवीसांनी जाहीरपणे अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी युतीच्या नावाखाली त्यातून माघार घेतली. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. भाजपानं एकटं पाडलं”, असं ते म्हणाले.