विरारमध्ये घर देण्याच्या नावाखाली १७ लाखांची फसवणूक करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला. राजू शेट्टी असे या रिअल इस्टेट एजंटचे नाव असून त्याने ६५ वर्षांच्या वृद्धाकडून २०१३ साली १७ लाख रुपये घेतले होते. हा प्रकार समजताच मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टीला गाठले आणि फेसबुक लाइव्ह करत त्याला मारहाण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्ह केले होते. यात त्यांनी कर्करोगाने ग्रासलेल्या वृद्ध रुग्णाची व्यथा मांडली होती. विरारमध्ये राहणाऱ्या राजू शेट्टी या इस्टेट एजंटने त्या वृद्धाला १७ लाख रुपयांचा गंडा घातला होता. २०१३ मध्ये राजू शेट्टीने वृद्धाला विरारमध्ये घर घेऊन देण्याचे आश्वासन दिले. यासाठी त्याने वृद्ध रुग्णाकडून तब्बल १७ लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यावर त्याने घराचा ताबा दिलाच नाही. वृद्ध व्यक्तीने राजू शेट्टीकडे पैसे परत देण्याची विनंतीही केली. यासाठी पोलिसांकडेही धाव घेतली. मात्र, त्यांना मदत मिळाली नाही, असे त्या वृद्धाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

शेवटी वृद्ध रुग्णाने आणि त्याच्या मुलाने नितीन नांदगावकर यांच्याकडे व्यथा मांडली होती. यानंतर मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी राजू शेट्टीला गाठले आणि फेसबुक लाइव्ह करत त्याला चोपही दिला. पुढच्या दोन दिवसांत पैसे दिले नाही तर मनसे पुढे काय करणार हे त्याला दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला. मराठी माणसाच्या मदतीसाठी मनसे नेहमी सज्ज असेल, असे त्यांनी फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले आहे.