Shivsena Thackeray Group Vs MNS : मनसेच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी रात्री नारळ फेकत हल्ला केल्याची घटना ठाण्यात घडली. या घटनेनंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर आता राज ठाकरे यांनी एक्स अकाउंटवर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. “जशास तसं नाही तर जशास दुप्पट असं उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवली, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे”, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे यांनी काय म्हटलं?

“काल ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता. ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या. बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने यापुढे देखील रहावं. मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. ज्याची प्रचिती कालच आली”, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Thackeray Group Vs MNS : “आज ठाण्याने तुमची वाट पाहिली, यापुढे महाराष्ट्रात…”, मनसे नेत्याचा ठाकरे गटाला इशारा

“मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हणलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विध्न निर्माण करण आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्याना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही याची त्यांना पण जाणीव आहे”, असंही राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

“माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नका. फक्त ‘जशास तसे’ नाही तर, ‘जशास दुप्पट तसे’ उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे. महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत, ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीयेत ना याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल, इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. आणि तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गट आणि मनसेमध्ये वाद का रंगला?

शिवसेना उद्ध‌व ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या वाहनासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यानंतर शनिवारी रात्री भगवा सप्ताह निमित्ताने उद्धव ठाकरे हे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे येत जात असताना त्यांच्या ताफ्यावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी नारळफेक केली. या घटनेत ताफ्यातील काही वाहनाच्या काचा फुटल्या. या प्रकरणी मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns president raj thackeray appeal to the mns workers and shiv sena thackeray group vs mns thane gkt