Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी बुधवारी रात्री (९ ऑक्टोबर) निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्यात आज (१० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक गमावला, हे त्याहून मोठं दुःख आहे”, असं म्हणत राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे यांनी काय म्हटलं?

“रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकात आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं. रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि ‘लायसन्स राज’शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की ‘लायसन्स राज’ संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं. त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली.”

Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

हेही वाचा : रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर

“स्वतःच छोटेखानी घर असावं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न, हे हेरून टाटा हाऊसिंगची सुरुवात करणारे रतन टाटाच आणि प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी ‘नॅनो’ गाडीच्या निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवणारे टाटाच. टेटली, कोरस स्टील, जॅग्वार यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड ताब्यात घेणाऱ्या रतन टाटांना, सामान्य भारतीय माणसाची नस पण अचूक माहित होती. सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे कोणाकडून शिकायचं असेल तर रतन टाटांकडूनच. माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या ‘बोटॅनिकल उद्याना’साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला. बोटॅनिकल उद्यानाच्या उभारणीच्या वेळेला, सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला, पण कामाचा आवाका लक्षात घेऊन, आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही ते उद्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते.”

“रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की ‘बॉंबे हाऊस’ हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या ‘टॅंगो’ आणि ‘टिटो’ या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं.”

“आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा ‘कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक’ गमावला, हे त्याहून मोठं दुःख.छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली”, असं म्हणत राज ठाकरेंनी रतन टाटांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Story img Loader