Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. सर्वच पक्षांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली. राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत प्रचाराचा नारळ फोडला. आजच्या प्रचाराच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांवर जोरदार टीका केली. “एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं अजित पवारांसोबत बसणं म्हणजे श्वास घेता येईना. मात्र, नंतर अचानक कळलं अजित पवार मांडीवर येऊन बसले. मग हे कोणतं राजकारण सुरु आहे? महाराष्ट्राचं भविष्य काय आहे?”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे काय म्हणाले?

“कालच दिवाळी संपली आहे, आता आजपासून आमचे फटाके फुटायचे आहेत. आजची ही पहिली सभा आहे. त्यामुळे अजून वातावरण तापायचं आहे. आज मी फक्त तुमचं दर्शन करण्यासाठी आलो आहे. मी तुमच्याकडे एक हमी घेण्यासाठी आलो आहे. ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी त्यांना विजयी करा. २०१९ साली ज्यांना मतदान केलं, मग युती असेल किंवा आघाडी असेल. मात्र, आता युतीत कोण आहे आणि आघाडीत कोण? कशाचा कशाला पत्ता नाही. खरं तर पाच वर्षात पुन्हा मतदान होतं आहे. त्यामुळे तुम्ही याचा विचार करायला हवा. आमचा राजू पाटील हे विधानसभेत एकटे होते. मला त्यांचा अभिमान आहे, कारण आमचा आमदार विकणारा नव्हे तर टिकणारा होता. नाहीतर आमचं चिन्ह घेऊन जाऊन दुसरीकडे जाऊन बसला असता”, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली.

हेही वाचा : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा

u

“२०१९ ला शिवसेना आणि भाजपा यांच्यासमोर कोण होतं? राष्ट्रवादी आणि काँग्रेस. त्यानंतर मग एक पहाटेचा शपथविधी झाला. ते १५ मिनिटांत लग्न तुटलं. कारण काकांनी डोळे वटारले. मग लगेच आले घरी काका मला माफ करा. त्यानंतर ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाऊन उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा उद्धव ठाकरे व्यासपीठावर बसलेले असताना सांगितलं होतं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मग तेव्हाच आक्षेप का नाही घेतला? निकाल लागेपर्यंत कोणी काही बोललं नाही. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरून हिंदुहृद्यसम्राट हे नाव काढून टाकलं. स्वता:च्या स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीपर्यंत तुम्ही गेलात?”, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

“पुढे शिवसेनेतील ४० आमदार फुटून गेले आणि यांना (उद्धव ठाकरे) समजलंही नाही. ४० आमदार निघून गेले तरी मुख्यमंत्र्‍यांना पत्ता नाही. एकनाथ शिंदे हे ४० आमदार घेऊन जाणारे होते. तेव्हा एकनाथ शिंदे काय म्हणाले होते? काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांबरोबर बसणं आणि काम करणं आणि अजित पवारांबरोबर मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना. मग एकनाथ शिंदे भाजपाबरोबर जाऊन बसले आणि मुख्यमंत्री झाले. मग अचानक कळलं की अजित पवार मांडीवर येऊन बसले. आधी अजित पवारांचं नाव घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदेंना अजित पवारही तिकडे आल्यानंतर काही करता येईना. मग हे कोणतं राजकारण सुरु आहे”, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns president raj thackeray criticizes cm eknath shinde and ajit pawar in thane maharashtra vidhan sabha election 2024 gkt