मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवरती सगळा पक्ष असतो असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझे सहकारी, माझा महाराष्ट्र सैनिक त्यांच्यामुळेच माझी ओळख आहे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी पक्षाच्या कामगिरीवर बोलताना देशात ६५ वर्ष सत्ता गाजवली त्या काँग्रेसची परिस्थिती बघा असं उदाहरण दिलं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत ते बोलत होते.

आता बांगलादेशही आपल्याला सीमा बंद केल्याचं सांगतो; राज ठाकरे केंद्रावर संतापले

राज ठाकरे आणि मनसे याची तुलना केल्यास विसंवादी दिसते असं विचारण्यात आलं असता राज ठाकरेंनी सांगितलं की, “मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवरती सगळा पक्ष असतो. कदाचित कडवट बोलण्यामुळे मी लक्षात राहत असेन आणि माझे सहकारी यांच्या हातवाऱ्यांमुळे लक्षात राहत असतील. पण शेवटी पक्ष म्हणूनच नेता ओळखला जातो. मी व्याख्यान देणारा कोणी आहे म्हणून लोक ओळखतात असं नाही. एका राजकीय पक्षाचा नेता म्हणूनच माझ्याकडे पाहिलं जातं. माझे सहकारी, माझा महाराष्ट्र सैनिक त्यांच्यामुळेच माझी ओळख आहे”.

राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अबाधित आहे मात्र मनसेचा नाही असं का? विचारलं असता ते म्हणाले की, “यश हेच सगळं सागतं…माहिती नसणारी माणसं निवडून आली की त्यांचं महत्व कळतं. पण जेव्हा ती निवडून आलेली नसतात तेव्हा हे संपले की काय विचारतात. सर्वसामान्यांना नरेंद्र मोदींनंतर कोण माणसं आहेत विचारलं तर सांगता येणार नाही. राज्य मंत्रीमंडळातीलही मुख्यमंत्र्यानंतरची दोन तीन सोडले तर नावं सांगता येणार नाही. सर्वच राजकीय पक्षांमधील प्रमुख व्यक्ती ते सोडून इतरांची नावं होण्यासाठी वेळ घालवावा लागतो”.

Cyclone Tauktae : गुजरात दौऱ्यावरुन राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…

पुढे ते म्हणाले की “अनेकांना राजकीय पक्षांचा इतिहासच माहिती नसतो. कित्येक लोक अनेकांना माहिती नव्हती, सत्तेत आल्यानंतर ती कळू लागली. आज माझ्या पक्षाला १५ वर्ष झाली आहेत, तिथे ५०, ६० वर्ष झालेल्या पक्षातील लोकांना ओळखत नाही, माझं काय घेऊन बसलात”.

“२००९ ते २०१२ पर्यंत मनसेच दिसत होती. २०१४ मध्ये मोदी लाट आल्यानंतर सगळेच राजकीय पक्षांना चापट्या बसल्या, तशा मलाही बसल्या. माझ्या १५ वर्षाच्या पक्षाचं काय घेऊन बसलात, ज्या एका पक्षाने देशात ६५ वर्ष सत्ता गाजवली त्या काँग्रेसची परिस्थिती बघा. मी कोणासोबत तुलना करत नाही, पण या सर्व गोष्टीला एक प्रक्रिया असते आणि त्यातूनच जावं लागतं,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

राज ठाकरेंकडून जास्त अपेक्षा असल्याने असं झालं का? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, “प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्याकडून लोकांच्या अपेक्षा असतात. इतिहास काढला तर पराभव होणं आणि लोकांच्या अपेक्षा असणं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. १९८४ साली वाजपेयी पराभूत झाले होते. ते मतांमध्ये पराभूत झाले, वाजपेयी पराभूत झाले नाहीत. इंदिरा गांधी पडल्या होत्या. त्यांचा पराभव करणारे राजनारायण कोणाला आठवतात का? हे असले चढ उतार प्रत्येक पक्षात येत असतात. सुरुवातीच्या काळात शिवसेनेचं जरी पाहिलं तर महापालिकेला आलेल्या जागा प्रचंड होत्या, नंतर परत खाली आले होते. हा सगळा भरती ओहोटीचा प्रवास कोणत्याही राजकीय पक्षाला सुटलेला नाही. मी लहानपणापासून राजकारण पाहत असल्याने भरतीमुळे भरतं येत नाही आणि ओहोटीने वाईट वाटत नाही”.

“असेल माझा हरी ,तर देईल खाटल्यावरी या भूमिकेत मी नाही. पण सध्या लॉकडाउनमुळे सगळं बंद आहे. आणि आधी समाज आणि नंतर निवडणूक असंच असलं पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

भाजपा एकाच नेत्याच्या भोवती चालणारा पक्ष आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरेंनी सांगितलं की, “पूर्वीदेखील असंच होतं…अटलजी आणि अडवाणीजी हीच दोन माणसं होती. आता नरेंद्र मोदी आहेत. मोदींकडे पाहून लोक मतदान करतात, इतर कोणाकडे पाहूनही मतदान करत नाहीत. हे भाजपालादेखील माहिती आहे. शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली”.

“१९९८ मध्ये कांदा विषयावर निवडणूक झाली होती, राजकीय पक्ष वैगैरे सोडून द्या…कांद्याचे भाव वाढले यावर लोकसभेची निवडणूक झाली होती. या देशात निवडणुका प्रतिकांवर होतात हे सत्य आहे. मग ती प्रतिकं कधी नेते असतात तर कधी आंदोलनं असतात,” असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

Story img Loader