Raj Thackeray : पुण्यात तिसरे विश्व मराठी संमेलन आज पार पडले. हे विश्व मराठी संमेलन मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. आज या संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह आदी दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेसह विविध विषयांवर भाष्य केलं. राज्य सरकारने आणि आम्ही-तुम्ही सर्वांनी आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं. याच कार्यक्रमात राज ठाकरे यांनी एक विधान केलं. ‘अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो’, असं म्हणत राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे काय म्हणाले?

“तुमच्या मनात आलं असेल की मी या ठिकाणी कसा? हा शासनाचा कार्यक्रम आहे. पण मला उदय सामंत यांनी या कार्यक्रमासाठी बोलावलं. त्यामुळे मला तुमचं सर्वांचं दर्शन झालं. त्यासाठी मी उदय सामंत यांचे आभार मानतो. माझे मित्र अभिनेता रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. हे सर्व भाग्यवान माणसं, मी पुरस्कार दिला म्हणून नाही. पण यांना (अभिनेत्यांना) पुरस्कार मिळतात आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो. तिरस्कार घेऊन आम्हाला पुढे वाटचाल करावी लागते. मराठी भाषेसाठी आपल्याला खूप गोष्टी कराव्या लागतील. सयाजी शिंदे यांनी आता सांगितलं की त्यांनी आफ्रिकेतील व्यक्तीशी मराठीत कसं भांडण केलं. आपण आपल्या भाषेवर नेहमी ठाम राहिलं पाहिजे. कारण जग तुम्हाला त्यानंतरच दाद देतं”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

“दुसऱ्या देशातील माणसं हे आपल्या देशाशी आणि भाषेशी खूप प्रामाणिक असतात. मग त्यांचा अभिमान आपल्यालाही वाटायला लागतो की ते त्यांच्या भाषेशी किती प्रामाणिक आहेत. आपल्या देशात सुद्धा स्वत:च्या भाषेशी प्रामाणिक आहेत. आपल्या देशातील दुसरे राज्य जर त्यांच्या भाषेबाबत एवढा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलतो? एकमेकांना भेटल्यानंतर दुसऱ्या भाषेत कशासाठी बोलतो? आता कार्यक्रमात आपल्याकडे राज्यगीत लागलं होतं. जय जय महाराष्ट्र माझा.., मग भारतातील दुसऱ्या राज्यात कोणत्या राज्याचं राज्यगीत आहे?”, असंही राज ठाकरे म्हणाले.

“ज्या हिंद प्रांतावर १२५ वर्ष कोणी राज्य केलं असेल तर ते फक्त मराठ्यांनी केलं. ज्यांनी १२५ वर्ष राज्य केलं, त्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण जपायची नाही तर कोणी जपायची? आता कार्यक्रमाच्या आधी उदय सामंत यांनी मला सांगितलं की मराठी भाषेसाठी तुम्ही जे सांगतान त्यासाठी आम्ही मदत करू. ते मदत करतील अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेसाठी जे-जे आम्ही करू त्यासाठीही ते पाठिंबा देतील अशी देखील अपेक्षा आहे. पण तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करू नका. आतापर्यंत आलेला अनुभव आहे. कारण आम्ही जे करत आहोत ते मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठीच करत आहोत”, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.