Raj Thackeray Press Conference : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेतली. हनुमान चालिसा पठणावरुन आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून सध्या जोरदार टीका होत आहे. त्यानंतर आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन टीकाकारांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिल्लीतील हिंसाचावरुन दिली आहे.
सगळ्या मशिदींवरचे लाऊडस्पीकर अनाधिकृत आहेत तर आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्ही अनाधिकृत कशा मानता. मशिदिवरील भोंगे शांतता भंग करत असतील तर त्यांना परवानगी देऊ नका असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मुस्लिम समाजालाही समजले पाहिजे की या देशापेक्षा त्यांचा धर्म मोठा होऊ शकत नाही. लोकांना त्याचा त्रास होत आहे याची कल्पना त्यांना येणे आवश्यक आहे.
५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे
महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली
देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा. ३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे. मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही.
माझ्या सभेमध्ये मी स्पष्ट केले होते की, हा सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्षे हा विषय असाच राहिला आहे. तुम्ही पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असे राज ठाकरे म्हणाले.
मला दोन घोषणा करायच्या असल्याने पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा अनेक गोष्टी मी बोलेन. त्यामुळे आजची पत्रकार परिषद देशभरातल्या सर्वांना माझे एवढेच सांगने आहे भोंग्याचा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे महाआरती केली. यावेळी मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद १२ वाजता सुरू होणार आहे. पण या ठिकाणी दोन टीव्ही स्क्रीन लावण्यात आले आहेत. यामुळे या पत्रकार परिषदेत व्हिडिओद्वारे राज ठाकरे विरोधकांवर निशाणा साधण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.