राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे महाविकास आघाडी राज्यपालांना लक्ष्य करत असताना, दुसरीकडे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. यादरम्यान, मनसेनेही राज्यपालांवर टीका केली असून ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेने राज ठाकरेंची एक जुनी ऑडिओ क्लिप शेअर केली असून यामध्ये त्यांनी छत्रपतींबद्दल आपले विचार मांडले आहेत.
“काल-आज आणि उद्याही हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीची प्रेरणा ‘छत्रपती शिवाजीमहाराज’च होते आणि अखंड राहतील, हे हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपाल कोश्यारी यांना कळावं यासाठी ही चित्रफीत,” असं मनसेने ट्वीट करताना म्हटलं आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
या ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे छत्रपती शिवाजीमहाराज आजही महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असल्याचं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. “या ऊर्जेचा स्त्रोत पाहिला तर यामागे तीन अक्षरं दडली आहेत, ती म्हणजे शिवाजी. १६८० मध्ये महाराजांचं निधन झालं आणि १६८१ ला औरंगजेब महाराष्ट्रात आला. पुढील १६८१ ते १७०७ हा २७ वर्षांचा कालखंड औरंगजेब महाराष्ट्रात होता. या काळात संभाजीराजेंचं त्यांच्याशी युद्ध झालं. ताराराणी, संताजी धनाजी, राजाराम महाराजही होते. हे सगळं २७ वर्ष चालू होतं. या काळात औरंगजेबाने पाठवलेल्या पत्रांमध्ये महाराष्ट्रात जो काही विरोध झाला, लढाया झाल्या त्याचं वर्णन ‘शिवाजी अजून मला छळतोय’ असं केलं होतं,” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
“पुढे लढण्याची जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला औरंगजेब शिवाजी म्हणत होता. आजही त्याच प्रेरणेवर महाराष्ट्र उभा आहे. पेशवे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासामागेही तीच प्रेरणा आहे. अजूनही तीच एक प्रेरणा आपण पुढे घेऊन जात आहोत. इतकी मोठी व्यक्ती महाराष्ट्रात जन्माला आली आणि देशाला ही प्रेरणा दिली हे आपलं भाग्य आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
नेमका वाद काय आहे?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी (१९ नोव्हेंबर) मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजीमहाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजीमहाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं.
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
छत्रपती शिवाजीमहाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी पदमुक्त करावे, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असंही ते म्हणाले आहेत. तर वाट दाखविणारे आदर्श मानणार की वाट लावणारे, असा खोचक टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लगावला आहे. काँग्रेसनेही राज्यातील अनेक ठिकाणी राज्यपालांच्या फोटोलो जोडो मारो आंदोलन केलं आहे.