Maharashtra Government on Toll Free Entry to Mumbai : महाराष्ट्र राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुलुंड येथील टोलनाका बंद व्हावा यासाठी आंदोलन पुकारणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांनीही याप्रकरणी आता प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस टोलमाफीचा असल्याचं म्हणत निवडणूक झाल्यानंतर सरकारने ही निर्णय मागे घेऊ नये असं ते म्हणाले. टोलमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
“हा दिवस मुंबई आणि ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. गेल्या २० वर्षांपासून आम्ही टोल भरतोय. रोज टोल भरण्याकरता लांब रांगा लागतात, आज त्यापासून मुक्ती मिळाली आहे. राज ठाकरेंमुळे आजचा दिवस पाहायला मिळाला. कारण, राज ठाकरे सातत्याने याविषयी पाठपुरावा करत होते. आमच्या मनसैनिकांनी आंदोलने केली, आमच्यावर लाठीचार्ज झाला. गुन्हे दाखल झाले. आजही अनेक मनसैनिक कोर्टात यासाठी फेऱ्या मारत आहेत. स्वतः राज ठाकरे चारवेळा या कोर्टनाक्यावर उभे राहिले आहेत. आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय मोठा आहे”, असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.
हेही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रिमंडळात मोठी घोषणा; मुंबईत लहान मोटर वाहनांना टोलमाफी!
…तर महाराष्ट्र सैनिकांना पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल
“मी स्वतः वर्षभरापूर्वी येथे उपोषणाला बसलो होतो. राज ठाकरे त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले होते. दादा भुसे राज ठाकरेंना भेटले होते. तेव्हा मला खात्री होती की काहीतरी निर्णय झालेला आहे. तो निर्णय आज जाहीर झाला. त्यामुळे मी मंत्रिमंडळाचे आभार मानतो की तुम्ही या जाचातून ठाणेकरांना मोकळं केलं आहे. आम्ही याला निवडणूक म्हणून पाहत नाही. २० वर्षांच्या जाचातून आम्ही सुटलो अशा दृष्टीने आम्ही पाहतो. यात राजकारण आणू नका. फक्त अपेक्षा हीच आहे की निवडणूक झाल्यानतंर हा निर्णय बदलू नका, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना पुन्हा रस्त्यावर उतरावं लागलं”, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.