महाराष्ट्रात इतके विलक्षण लोक जन्माला आले. पण आपण त्या सर्वांना जातीमध्ये अडकलं आहे अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या चित्रपटासाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला असून, सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या आठवणी, विचार मोकळेपणाने मांडले. तसंच राज्यातील सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करत नाराजी जाहीर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची ओळखच आहे. पण महात्मा ज्योतीराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्ववर महाराज यांच्यासह इतके संत, साहित्यिक, क्रांतीकारक आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि ही माती विचारांनी सुपिक केली. पण आम्ही त्यांना जातीमध्ये बांधत आहोत. हे मराठ्यांचे, हे दलितांचे. हे माळ्याचे…इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी याआधी कधी पाहिलेला नाही,” असं राज ठाकरे म्हणाले.

“…तर मी तिरळाच झालो असतो” राज ठाकरेंनी सांगितला चित्रपटाला ‘व्हाईस ओव्हर’ देतानाचा ‘किस्सा’

राज ठाकरेंची अनकट मुलाखत

पुढे ते म्हणाले की “ही सर्वांची माणसं असून आपण त्यांना सर्वदूर पोहोचवली पाहिजेत. आमच्याकडे किती विलक्षण माणसं होऊन गेली हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पण त्याऐवजी आपण हे आमचे असून यांचं नाव तुम्ही घ्यायचं नाही, लिहायचं नाही असं सांगत असतो. काहींना यातून आनंद मिळतो, तर काहींना राजकीय फायदे मिळतात”.

राज ठाकरेंची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांवर आणणार तीन भागांचा चित्रपट

“इतकी मोठी माणसं आपल्याकडे जन्माला आल्यानंतर त्यांचे गुणगान गाण्याऐवजी जातीत कसले बांधत आहोत? छत्रपतींनी तर १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची मांडणी केली होती. त्यांना आपण जातीत बांधत आहोत. लोकमान्य टिळकांना आपण ब्राह्मण म्हणत आहोत. हा महाराष्ट्र आपण कुठे नेऊन ठेवला आहे? पूर्वी दूरदर्शनला ‘आपली माती, आपली माणसं’ कार्यक्रम यायचा, त्याचं नाव बदलून आता ‘आमच्या माणसांनी केलेली आमची माती’ असं केलं पाहिजे,” असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray on caste politics in maharashtra har har mahadev film chhatrapati shivaji maharaj sgy
Show comments