राज्यात करोनाचं संकट असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर राहूनच कामकाज पाहिलं. मात्र, त्यावरून भाजपाकडून सातत्याने उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत होतं. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या नेस्को मैदानात झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी लगावलेल्या टोल्यावर आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी प्रतिटोला लगावला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
या राजकीय कलगीतुऱ्याला सुरुवात राज ठाकरेंनी केलेल्या टीकेपासून झाली. नेस्को मैदानातील मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या घरीच थांबण्यावरून टोला लगावला होता. “काल-परवा मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर आहेत असे…मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं”, असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते.
उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष टोला!
दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंनी त्यांचं नाव न घेता खोचक टीका केली आहे. मुंबईच्या वांद्रे येथे लहुजी वस्ताद साळवी जयंती कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. “मी हळूहळू बाहेर पडतोय. आपलं सरकार असताना दोन वर्षे करोनात गेली. नंतर माझी शस्त्रक्रिया झाल्याने सहा महिने गेले. त्यामुळे मला घराबाहेर पडता येत नव्हते. मी घराबाहेर पडत नसल्याने हा घराबाहेर पडत नाही, अशी टीका करण्यात येत होती. आता घराबाहेर पडलो, तर यांच्या पोटात गोळा यायला लागला आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
राज ठाकरेंचं प्रत्युत्तर!
उद्धव ठाकरेंच्या या विधानावर राज ठाकरेंना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी हा दावाच उडवून लावला. राज ठाकरे आजपासून कोकण दोऱ्यावर आहेत. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारणा केली. तेव्हा “नाही हो.. गोळे बिळे येत नाहीत असले काही.. काहीतरी काय? हे बाहेर पडले म्हणून माझ्या पोटात कशाला येतील गोळे?” असा खोचक सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला.