नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने २४ रुग्णांना आपली जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी रोष व्यक्त केला असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
“आज विरारमधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत,” असं राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
एसी ठरला १३ रुग्णांच्या मृत्यूचं कारण; जाणून घ्या विरारमध्ये नेमकं काय घडलं?
“सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य, पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांचं, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत,” अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
…पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. (२/२) #VirarFire
— Raj Thackeray (@RajThackeray) April 23, 2021
नेमकं काय घडलं –
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रात्री ३ वाजता लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात धावपळ सुरु झाली होती. आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. यामधील चौघे जण जे चालू शकत होते त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली. मात्र इतर रुग्ण आपला जीव वाचवू शकले नाहीत आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. आगाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.
धक्कादायक: विरारमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ करोना रुग्णांचा मृत्यू
रुग्णालयात एकूण ९० रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर ऑक्सिजनवर असणाऱ्या तसंच गंभीर प्रकृती असणाऱ्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. २१ रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं असून यामध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.
आगीत होरपळून मृत्यू झालेल्या १३ रुग्णांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.
मृतांची नावं –
१) उमा सुरेश कनगुटकर – (स्त्री – ६३ वर्ष)
२) निलेश भोईर – (पुरुष – ३५ वर्ष)
३) पुखराज वल्लभदास वैष्णव – (पुरुष – ६८ वर्ष)
४) रजनी आर कडू – (स्त्री – ६० वर्ष)
५) नरेंद्र शंकर शिंदे – (पुरुष – ५८ वर्ष)
६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे – (पुरुष – ६३ वर्ष)
७) कुमार किशोर दोशी – (पुरुष – ४५ वर्ष)
८) रमेश टी उपयान – (पुरुष – ५५ वर्ष)
९) प्रविण शिवलाल गोडा (पुरुष – ६५ वर्ष)
१०) अमेय राजेश राऊत – (पुरुष – २३ वर्ष)
११) शमा अरुण म्हात्रे – (स्त्री – ४८वर्ष)
१२) सुवर्णा एस पितळे – (स्त्री – ६४ वर्ष)
१३) सुप्रिया देशमुख – (स्त्री – ४३ वर्ष)