MNS And Shivsena Politics : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत राज्याच्या राजकारणात आज जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या चर्चां मागचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत मोठं भाष्य केलं. ‘मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत, एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण नाही’ असं सांगत राज ठाकरे यांनी थेट ठाकरे गटाबरोबर युतीचे संकेतच दिले. त्यामुळे यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याबाबत लक्ष लागलेलं असतानाच उद्धव ठाकरे यांनीही आजच प्रतिक्रिया दिली.
आपण देखील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका मांडत एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना प्रतिसाद दिला. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर राज्यातील अनेक नेत्यांनी आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह आदी नेत्यांनी भूमिका मांडली. दरम्यान, कोणत्या नेत्यांनी काय भूमिका मांडली? हे जाणून घेऊयात.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मराठीच्या मुद्यांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असल्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काहीही वाईट वाटण्याचं कारण नाही. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“भारतीय जनता पक्षाला ठाकरे हे नाव नष्ट करायचं आहे. अशावेळी जर दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्र स्वागत करेल. आम्ही आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर प्रतिक्षा करणार आहोत. आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहोत. शेवटी महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वत: त्यांच्या पक्षाचं काम करतात. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही यावं? हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षांने सांगण्याचं काही कारण नाही. माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून जे जे त्यांना योग्य वाटतं तो निर्णय त्यांनी घ्यावा”, असं अजित पवार म्हटलं.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
“महाराष्ट्राच्या हितापुढे कोणाच्याही महत्वकांक्षा एवढ्या महत्वाच्या नाहीत, हे राज ठाकरे यांनी केलेलं विधान मला पटलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ-भाऊ आहेत. त्यांनी कुटुंब म्हणून एकत्र राहिलंच पाहिजे. पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी वेगळं होत नाही. असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. मात्र, या दोघांचं राजकारण एकत्र असलं पाहिजे का? यावर नक्कीच चर्चा होऊ शकते. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि हितासाठी जर दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर प्रत्येक मनाला ते आवडेल. पण ते एकत्रित येणं ज्या भाजपाने महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवण्याचं राजकारण केलं, राज्यातील प्रादेशिक पक्षांना नख लावण्याचं काम केलं. त्या भाजपाच्या विरोधात बिगुल वाजून विचारांची स्पष्टता ठेवत स्वतंत्र अस्मितेचं राज कारण करण्यासाठी राज साहेब सिद्ध होणार आहेत का? या प्रश्नांचं उत्तर मिळायला हवं. स्वतंत्र राजकारणाच्या अस्मितेसाठी एकत्र येणं असेल की भाजपाचं मांडलिकत्व पत्करण्यासाठी असेल? याबाबत स्पष्टता असली पाहिजे”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
“२०१४ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसनेनेची युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क केला, दोघे बोलले आणि एकत्र लढायचे ठरले. यावर आमच्याकडून बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून अनिल देसाई चर्चा करतील असे ठरले होते. त्याच्यासाठी राज ठाकरे यांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. हे ठरल्यानंतर दोन दिवस उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांनी फोन उचलले नाही. अनिल देसाईंनी त्यांचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली तरीही मनसेने एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. हे सांगायचा उद्देश असा की, आम्हाला शिवसेनेने २०१४ आणि २०१७ (मुंबई महापालिका निवडणूक) असा दोन वेळा धोका दिला होता”, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या पक्षाच्या संघटनेत दुसऱ्यांनी येणं हे उचित वाटत नाही. हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. महाविकास आघाडीबरोबर काय झालं? युती केली, पण शरद पवार आणि त्यांचं कधी जमलं का? नाही. काँग्रेसचं आणि त्यांचं कधी जमलं का? नाही. आता राज ठाकरे यांच्याबरोबर तर त्यांचं मुळात जमणार नाही. राज ठाकरे यांना सर्व गोष्टींची जाणीव आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यास उद्धव ठाकरे हे तयार होणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे यांचा इगो दरवेळी आडवा येतो. त्यामुळे ठाकरे कुटुंब विभक्त झालं”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.