गेल्या तीन वर्षांत राज्यात दोन वेळा सत्ताबदल झाला. या दोन्ही वेळी प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. यातून सत्तेची समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली. २०१९आधी शिवसेना-भाजपा युतीचं सरकार अस्तित्वात येणार असं बोललं जात असताना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सेनेतील आमदारांचा मोठा गट फोडला आणि भाजपासोबत हातमिळवणी करत नव्याने राज्यात सरकार स्थापन केलं. या सर्व पार्श्वभूमीवर पडद्यामागील घडामोडी हा मोठा चर्चेचा विषय ठरलेला असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर २०१९च्या सत्तानाट्यावरून टीकास्त्र सोडलं आहे.
बऱ्याच कालखंडानंतर राज ठाकरेंनी जाहीर भाषणात आपली भूमिका मांडली. आज मनसे पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी गेल्या काही महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. हिप बोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जाहीर सभेत बोलत होते.
“तेव्हा असं ठरलं होतं की…!”
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपामध्ये २०१९ साली झालेल्या फारकतीवर तोंडसुख घेतलं. “२०१९ला निवडणुका झाल्यानंतर शिवसेना-भाजपानं फारकत घेतली. का? तर म्हणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं. मला अजूनही आठवतंय. मला माहिती आहे. कारण बाळासाहेब असताना झालेल्या त्या बैठकांमध्ये मी होतो. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे बरेच जण होते. तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे, तर २०१९ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
“हे म्हणतात मी शब्द घेतला होता. चार भिंतींमध्ये शब्द घेतला होता? तिथे दोनच माणसं. एक तर हे खरं बोलतायत किंवा ते खरं बोलतायत. मुळात तुम्ही मागणी करताच कशी? जास्त आमदार असणाऱ्याचा मुख्यमंत्री हे ठरलं असताना तुम्ही मागणी करताच कशी? मोदी व्यासपीठावर भाषण करताना तिथे उद्धव ठाकरे बसलेले होते. मोदी त्यांच्या भाषणात सांगत होते की आपली पुन्हा सत्ता येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. अमित शाह यांनीही भाषणात फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सांगितलं. त्याच वेळी आक्षेप का नाही घेतला? त्याचवेळी त्यांना फोन का नाही केला? सगळे निकाल लागल्यानंतर मग तुम्हाला आठवलं? कारण या सगळ्या गोष्टींची बोलणी आधीपासून सुरू असणार”, असा दावा राज ठाकरेंनी यावेळी केला.
“२०१९ ला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचं सरकार अस्तित्वात आलं. लोकांनी मतदान कुणाला केलं होतं? शिवसेना-भाजपाला मतदान करणारे लोक आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणारी लोक, या दोघांना काय वाटलं असेल? ही हिंमत त्याच वेळी होते, जेव्हा लोक त्यांना शिक्षा करत नाहीत. जनता यांना शिक्षा करत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
“राजकारण इतका गंभीर विषय आहे. आत्ताच्या सरकारच्या भाषेत आपण त्याला खेळाचा दर्जा दिला आहे. दहीहंडीला देतोच आहोत. मंगळागौरलाही खेळाचा दर्जा द्यायचाय म्हणे. खरंतर लग्न झाल्या झाल्या त्याला हार घालून खेळाचा दर्जा दिला पाहिजे”, असा टोला देखील राज ठाकरेंनी यावेळी लगावला.