मुंबईत गटाध्यक्षांच्या मेळावा पार पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कंबर कसली असून कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याची सूचना केली आहे. तसंच पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्याकडे सत्तेची चावी सोपवण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला आहे. राज ठाकरेंनी ट्वीट करत मनसे कार्यकर्त्यांना विनंती केली आहे.
राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की “मी सर्व मनसैनिकांना आगामी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आणि आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी विनंती करतो. मी तुम्हाला शब्द तो, हा राज ठाकरे त्यानंतर निवडणूक जिंकेल आणि सत्ता तुमच्या हातात सोपवेल”.
याआधी मुंबईत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी ‘मी तुम्हाला सत्तेच्या खूर्चीवर बसवणार’ असं म्हटलं होतं. “मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. लवकरच आपली सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. तसंच शिवसेनेला सहानुभूती मिळतीये हा भ्रम आहे असंही म्हणाले होते.
गोरेगावच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले?
सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा खालावत असून महिला नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका, जाती-पातीचे विष कालवले जात आहे. देश पातळीवरही राष्ट्रपुरुषांची सुरू असलेली बदनामी भाजप-काँग्रेसने त्वरित थांबवावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलताना केलं. मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन पुन्हा सुरू करण्याचे आणि आरे ला कारे ने चोख उत्तर देण्याचे आदेशही त्यांनी या वेळी मनसैनिकांना दिले.
कलुषित वातावरणामुळे उद्योग, मुले-मुली देशाबाहेर जात असून आपण महाराष्ट्र कुठे घेऊन चाललो आहोत याचे भान राज्यातील नेत्यांनी ठेवावे, असे ठणकावून सांगत राज यांनी या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनाही खडसावले.
गुजराती- मारवाडींचा पुळका घेणाऱ्या राज्यपालांनी आधी ही मंडळी व्यवसायासाठी राज्यात का आली याचा विचार करावा, केवळ राज्यपाल आहात म्हणून मान राखतोय.. राज्यात शिव्यांची कमतरता नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातून उद्योग जात असून केंद्र सरकारनेही केवळ गुजरात गुजरात न करता अन्य राज्यांकडेही समान वृत्तीने पाहावे. सगळय़ाच राज्यांचा विकास झाला पाहिजे; पण देशातील कलुषित वातावरणामुळे पाच लाख उद्योजक देशाबाहेर गेल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी सावरकरांची बदनामी करीत आहेत. मात्र कारागृहातून सुटून पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठीची सावरकरांची ती रणनीती होती. चांगल्या कामासाठी खोटे बोलले तरी त्यात गैर नाही हीच कृष्णनीती असल्याचा दावा करीत देशातील महापुरुषांची बदनामी थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले.