छत्रपती संभाजीराजे यांचे अद्याप तळय़ात-मळय़ात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेने संभाजीराजेंना डावलल्यानंतर मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसंच शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचे आमदार राजू पाटील यांचं ट्वीट

राजू पाटील यांनी ट्वीट केलं असून सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे असा सल्ला दिला आहे. तसंच राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारण कशासाठी? अशी विचारणा केली आहे.

“महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करा”; अमोल मिटकरी फडणवीसांवर संतापले; म्हणाले “यापुढे जर शरद पवारांचं नाव घेतलं…”

मनसे नेते गजानन काळे यांनीदेखील ट्वीट करत राजेंचा मान सन्मान कसा ठेवायचा हे आम्हास ठाऊक असल्याचं सांगितलं आहे. मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. बाकी नाव छत्रपतींचे घ्यायचे आणि छत्रपतींच्या वंशजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही सेना आणि महाविकास आघाडीची निती असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.

नेमकं काय झालंय?

राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. फक्त त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे अधिकृत उमदेवार म्हणून रिंगणात उतरावे ही अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे. या साऱ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेने संभाजीराजे यांना सूचक इशारा दिला. कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची दुसरी उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली. संभाजीराजे हे कोल्हापूरचे आहेत. यामुळेच कोल्हापूरच्या दुसऱ्या नेत्याला उमेदवारी देण्याची रणनीती शिवसेनेने आखली.

मंगळवारी सकाळी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना तातडीने मुंबईत येण्याचा व राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर संजय पवार मुंबईत दाखल झाले व शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्यासोबत त्यांनी कागदपत्रांची तयारी सुरू केली.

या सर्व घडामोडींबाबत माध्यमांनी शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराबाबत विचारले असता, संजय पवार हे दुसऱ्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरत आहेत. मात्र, उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील, असे राऊत यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीराजे यांचा आम्ही सन्मान करतो. पण राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात, असा टोलाही राऊत यांनी लगावला. मुंबईत आलेल्या संजय पवार यांना तुम्ही मूळ उमेदवार असणार की तुमचा अर्ज डमी उमेदवार म्हणून भरण्यात येत आहे, असे विचारले असता, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. ते म्हणतील तसे होईल, असे उत्तर संजय पवार यांनी दिले. संभाजीराजे हे अद्यापही शिवसेनेत प्रवेश करण्यास अनुकूल नाहीत. येत्या दोन दिवसांत संभाजीराजे यांच्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.