महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे प्रशासन परवानगी देईल की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नसताना मनसे मात्र सभा घेण्यावर ठाम आहे. त्यातच आता मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध कऱण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला हा टीझर शेअऱ केला आहे.
राज ठाकरेंची सभा रद्द होणार? औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदी; पोलिसांचे आदेश
मनसेने टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला असून चलो संभाजीनगर अशी घोषणा दिली आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राज ठाकरे आपण धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचं सांगत आहेत.
इथे पहा टीझर –
औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी रमजान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सुचवलं आहे. त्यामुळे ही सभा होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.
दरम्यान संदीप देशपांडे यांनी आणखी एका ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “अजानची स्पर्धा भरवणारे, हनुमान चालिसाला विरोध करणारे नव पुरोगामीच आणि नव पुरोगाम्यांना आपण हिंदू आहोत याची जाणीव करून देणारे राजसाहेबच. आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी “बुंदसे गयी वो हौद से नहीं आती”,” असा टोला संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
औरंगाबादमध्ये ९ मे पर्यंत जमावबंदी
१ मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार असताना पोलिसांनी मात्र औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश प्रसिद्ध केला आहे. सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत पोलिसांनी ही जमावबंदी लागू केली आहे. आदेशामध्ये मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्यासंबंधी दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे राज ठाकरेंची सभा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांची सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा दुसऱ्या ठिकाणी घेण्यासंदर्भातील चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती आहे.