महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. या भाषणानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. शरद पवारांवर टीका केल्याने प्रसिद्धी मिळते अशा अर्थाचा खोचक टोला दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला होता. मात्र या प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका केली जात असल्याच्या आरोपाला आता मनसेने उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते; ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…”; संजय राऊतांना मनसेचा खोचक टोला

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणालेल्या?
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज यांना आलेला ईडीच्या नोटीशीचा संदर्भ देत टीका केलेली. “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केलाय. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

नक्की वाचा >> “बाळासाहेब, आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून…”; मनसेची शिवसेना भवनासमोरच बॅनरबाजी

पत्रकाराने राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांचं नाव घेऊन टीका केल्याचं सुप्रिया यांना सांगत पुढील प्रश्न विचारला. १९९९ साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवरांना अशापद्धतीचं राजकारण केल्याचं ते म्हणाले, असं सुप्रिया यांना विचारण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया यांनी मोजक्या शब्दात राज यांच्या टीकेचा समाचार घेतला. “शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाइन होत नाही हे ५५ वर्ष महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे त्यांच नाव घेतलं की कोणाचीही हेडलाइन होते. याचा उपयोग जर पक्षाला होणार असेल तर मला त्याचा आनंद आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…

मनसेचं उत्तर…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना प्रसिद्धीसाठी शरद पवारांवर राज ठाकरेंनी टीका केल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. “मला वाटतं की ज्या माणसाच्या सभेला दोन लाख लोक येतात. एक आमदार आणि काही नगरसेवक असणाऱ्या व्यक्तीच्या सभेला दोन दोन लाख लोक येत असतील तर त्याला प्रसिद्धीची गरज नाहीय,” असं उत्तर अविनाश जाधव यांनी दिलं.

नक्की वाचा >> पुण्यातील मनसे शहराध्यक्षांचा राज यांना घरचा आहेर; भोंगे लावण्यास नकार देत म्हणाले, “राजसाहेबांचं भाषण कळलंच नाही, आम्ही…”

आव्ह्डांमुळे हिंदू मत मिळत नसल्याचा दावा…
पुढे बोलताना जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा संदर्भ देत टोला लागवला. “प्रसिद्धीची गरज कोणालाय, ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना आहे. तीन तीन वेळा प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते राज ठाकरेंवर बोलतात त्यावेळेस प्रसिद्धी काय हे कळतं. मुंब्र्यावरील प्रेम दिसून येतं,” असं आव्हाड म्हणाले. तसेच पुढे बोलताना आव्हाड यांच्या भूमिकेमुळे ठाणे शहरातील कार्यकर्ते नाराज असल्याचा दावाही जाधव यांनी केला.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”

“मला असं वाटतं की त्या व्यतिरिक्तही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाण्यात काम करतात. मला वाटतं त्या सगळ्यांनी जे वर्षानुवर्षे त्यांच्या वॉर्डात काम करतायत त्यांना कोण मतदान करणार, कुठला हिंदू मतदान करणार. आव्हाड फक्त स्वत:च्या मतदारसंघाचा विचार करतायत. अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे की त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना मतदारसंघात मतदार जमा करता येत नाहीत. ही नाराजी ठाण्यातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकदा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलावं,” असा सल्ला जाधव यांनी दिला.

Story img Loader